• Fri. Mar 13th, 2026
    Crime News : सकाळी शेतात गेल्या, पुन्हा परतल्याच नाही, वृद्ध महिलेला निर्घृणपणे संपवलं; छ.संभाजीनगरमध्ये काय घडलं?

    Chhatrapati Sambhajinagar Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    संभाजीनगर शेतात वृद्ध महिलेची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शेकटा शिवारात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 75 वर्षीय वृद्ध शेतकरी महिलेची अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून, शांत स्वभावाच्या वृद्धेचा इतक्या क्रूरपणे हत्या का करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    नेमकं काय घडलं?

    सुंदरबाई उर्फ लक्ष्मीबाई नामदेव जाधव (वय 75, रा. शेकटा) असं मृत महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरबाई काल शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या स्वतःच्या शेतात गट क्रमांक 19 कामासाठी गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. दरम्यान, शेतातून घरी जाणाऱ्या काही ग्रामस्थांना सुंदरबाई या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. मयत सुंदरबाई जाधव या अत्यंत साध्या स्वभावाच्या होत्या. गावातील कोणाशीही त्यांचे वैमनस्य किंवा भांडण नव्हते. ही हत्या झाल्याने करमाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुंदरबाई यांच्या पश्चात दोन मुले आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
    Maharashtra TimesCrime News : आठवीतील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक, महाराष्ट्र सुन्न
    घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. या प्रकरणाचा तपास बीट जमादार संतोष चव्हाण यांच्यासह पोलिसांचे विशेष पथक करत असून लवकरच आरोपीला जेरबंद केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    Maharashtra TimesAbhishek Kalamkar : नोकरीचं आमिष देवून तरुणीसोबत नको ते कृत्य केल्याचा आरोप, माजी महापौरावर चित्रा वाघ संतापल्या

    संग्रामचं वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं

    अंगावर खाकी वर्दी चढवून आपल्या कुटुंबाची गरिबी दूर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान दुर्दैवी अंत झाला आहे. 1600 मीटर धावण्याची शारीरिक चाचणी सुरू असतानाच हा तरुण मैदानावर कोसळला आणि त्याची प्राणज्योत मालवली. छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे भरती प्रक्रियेसाठी आलेल्या हजारो उमेदवारांमध्ये मोठी शोककळा पसरली असून पोलीस प्रशासनाकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा