• Fri. Mar 6th, 2026

    Narhari Zirwal : ‘पुराव्यात मंत्र्यांचं नाव आलं असतं तर आम्ही राजीनामा घेतला असता’, देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट वक्तव्य

    Narhari Zirwal : ‘पुराव्यात मंत्र्यांचं नाव आलं असतं तर आम्ही राजीनामा घेतला असता’, देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट वक्तव्य

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात करण्यात आलेल्या एसीबीच्या कारवाईवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांना विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या झिरवळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबतही प्रश्न विचारण्यात आला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर एसीबी धाड पडली होती. या कारवाईत नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला रंगेहात लाच घेताना पकडण्यात आलं होतं. या कारवाईनंतर विरोधकांकडून नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत एसीबीच्या या कारवाईवर आणि नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सविस्तर भूमिका मांडली.

    “आपल्याला एक कल्पना देतो, एसीबी ट्रॅप कधी करतं माहिती आहे? सापळा रचण्याआधी पूर्ण पुरावे तयार होतात. संभाषण तयार होतं. किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तक्रादारासोबत जावून काय बोलणं झालंय याची नोंद घेत असतं. त्याच्या नोंदी असतात. त्या नोंदीमध्ये ज्यांची नावे येतात, ज्यांच्या विरुद्ध पुरावे असतात किंवा थेट पुरावे असतात, त्याच्यावर कारवाई होते”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    “आता समजा एक लिपिक आहे, त्या लिपिकाने पैसे मागितले आणि त्याला पकडलं, तर त्याच्यावर योग्यप्रकारे सुपरविजन न करणारे वरचे अधिकारी असतात, त्यांच्यावरही काही ना काही कारवाई होते म्हणून त्यांची बदली होते. या संदर्भात ज्यांची बदली झाली आहे त्यांच्याबद्दल अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेऊन बोलेन. पण या सर्व पुराव्यामध्ये आणि कुठल्याही संभाषणामध्ये मंत्र्यांचं नाव आलेलं नाही. ते जर आलं असतं तर आम्ही निश्चितपणे मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. पण त्यांचं नाव कुठेही आलेलं नाही”, असं स्पष्ट वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

    मंत्रालयात अशी कारवाई होवो, किंवा तहसीलदाराच्या कार्यालयात होवो, अशी कुठलीही घटना घडली तरी राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसतोच. कारण कुणीही राज्य सरकारचा अधिकारी किंवा कर्मचारी जेव्हा अशाप्रकारची लाचखोरी करतो तेव्हा ते कोणत्याही सरकारला भूषणावह नसतंच. म्हणूनच तुम्ही बघा. याला दोन्ही पद्धतीने पाहता येईल. एक पद्धत आहे, कारवाई न करता येणं, पण आम्ही दुसरी पद्धत अवलंबली आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई करणं. रोज तुम्हाला लक्षात येत असेल. आम्ही झिरो टॉलरन्स ठेवला आहे. कुठेना कुठे कारवाई चाललेली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    “एसीबीला सागितलं आहे की, अशा पद्धतीने कुणी वागत असेल आणि जनसामान्यांकडून पैसे वसूल करत असेल तर कारवाई कराच. आता यावर कुणीतरी दुसरं म्हणत असेल की, लाचखोरीची प्रकरणं वाढली. प्रकरणं वाढली नाहीत तर कदाचित ते आधी करत असतील पण ते तुम्हाला माहिती नव्हतं. तुम्ही कारवाई केली नसेल. समजल्याबरोबर कारवाई करणं हाच या मागचा उपाय आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा