• Mon. Mar 16th, 2026

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत बोलल्या, म्हणाल्या, ‘यंदाचा अर्थसंकल्प अजित दादांचा 12 वा अर्थसंकल्प ठरला असता, पण…’

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत बोलल्या, म्हणाल्या, ‘यंदाचा अर्थसंकल्प अजित दादांचा 12 वा अर्थसंकल्प ठरला असता, पण…’

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची पत्रकार परिषद पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वात आधी सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चहापानाच्या कार्यक्रमाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सर्वात आधी सुनेत्रा पवार यांनी भूमिका मांडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरे गेल्या. यावेळी त्यांनी मुद्देसूद भूमिका मांडली.

    “उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्याची जुनी परंपरा आहे. चहापानाचा कार्यक्रम केवळ अनौपचारिक नसतो तर संवादाचा मंच असतो. या मंचावर राज्याच्या विकासावर चर्चा व्हावी, जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावेत आणि त्यातून मार्ग निघावेत, अशी अपेक्षा असते. यंदाचे अधिवेशन हे महायुतीच्या सरकारचे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. जनतेने मोठ्या विश्वासाने गेल्या वर्षी पुन्हा एकदा महायुतीला सत्ता दिली. त्या विश्वासाने न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

    “अजित दादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित दादा यांना मिळाला आहे. अजित पवार यांनी 2011 मध्ये सादर केलेला पहिला अर्थसंकल्प हा 1,44,783 कोटी रुपयांचा होता. तर मागच्या वर्षी त्यांच्या कारकीर्दीतील शेवटचा अर्थसंकल्प 7,20,000 कोटी रुपयांपर्यंच पोहोचला. या अर्थसंकल्पीय आकारमानात झालेली भरीव वाढ ही केवळ आकड्यांची वाढ नाही तर महाराष्ट्राला सर्वांगीण विकासाकडे नेण्याचं प्रगतीचं द्योतक आहे”, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

    “अजित दादांनी विकासाच्या वेगात सुद्धा राज्याच्या आर्थिक शिस्तशी कधीही तडजोड केली नाही. विकास आणि शिस्त याचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम करण्याचं काम त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने अजित पवार यांच्या अर्थसंकल्पाची सुरुवात झाली होती. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हा त्यांच्या कारकीर्दीतला 12 वा अर्थसंकल्प ठरला असता. पण अचानक आपल्याला सोडून ते गेले. यापूर्वीत अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची केलेली तयारी अंतिम टप्प्यात नेली आहे”, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.

    “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे नेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न होता. त्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. आर्थिक शिस्त आणि नियोजनपूर्वक विकास यांच्यातील समतोल हेच त्यांच्या कामाचे सूत्र होते”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

    “यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील. हा अर्थ संकल्प राज्याच्या प्रत्येक घटकाला पुढे नेणारा असेल, न्याय देणारा असेल याचा मला ठाम विश्वास आहे. महायुती सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका झाली. पण अजित पवार यांनी योग्य आर्थिक नियोजन करुन या योजनेसाठी निधीची कमतरता कधीच भासू दिली नाही. माझं हे पहिलेच अधिवेशन आहे. अत्यंत चांगल्याप्रकारे अधिवेशन चालेल अशी मला खात्री आहे”, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी यावेळी मांडली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा