• Fri. Mar 6th, 2026
    Marathi Schools: मुंबईत मराठी शाळांची दैना! तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर, काय कारण?

    मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मराठी राजभाषा दिनाचे पडघम वाजू लागले असताना मुंबई शहर व उपनगरांमधील मराठी माध्यमाच्या तब्बल ५७ शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहेत. मराठी शाळांच्या या ऱ्हासासाठी राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी घेतलेल्या संचमान्यतेचा निर्णय कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

    मुंबई शहर व उपनगरात सर्व बोर्डांच्या मिळून १,७३६ शाळा आहेत. यापैकी सध्या सुरू असलेल्या मराठी शाळांची संख्या ३३७ आहे. सात वर्षांमध्ये मराठी शाळांचा आकडा ४६१वरून इतका रोडावला. यातील ८४ शाळा गेल्या वर्षांतच बंद पडल्या. यात आता ५७ शाळांची भर पडण्याची शक्यता आहे. तसे झाले, तर मुंबईतील मराठी शाळांची संख्या २८०वर येईल. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळावी, यासाठी एकेकाळी रक्त सांडणाऱ्या मराठी माणसांच्या मुंबईत मराठी शाळाच अल्पसंख्याक होणार आहेत.

    Mantralaya Bribe Case: गाडे यांचे नाव का लपवले? FDA लाचखोरी प्रकरणात तक्रारदारांचा आक्षेप
    बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या ५७पैकी ३४ शाळा पश्चिम मुंबई जिल्ह्यातील असून १९ शाळा उत्तर मुंबईतील आहेत. तर चार शाळा दक्षिण मुंबईत आहेत. या शाळा बंद पडण्यामागे अपुरी विद्यार्थीसंख्या हे प्रमुख कारण आहेच, पण त्यात राज्य सरकारच्या संचमान्यतेचा निर्णयही कारणीभूत आहे. पूर्वीच्या पद्धतीनुसार शाळेतील एकूण पटसंख्येच्या आधारे प्रत्येक २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षकपद सरकारकडून मंजूर केले जात होते, मात्र शिक्षण विभागाने लागू केलेल्या नव्या नियमावली आणि सॉफ्टवेअर प्रणालीमुळे आता शिक्षकपदांची मान्यता शाळेच्या एकूण पटसंख्येऐवजी प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार दिली जाणार आहे.

    या नव्या निकषांचा परिणाम लहान पटसंख्येच्या शाळांवर गंभीरपणे होण्याची शक्यता आहे. माटुंगा येथील एका शाळेत पहिली ते आठवी मिळून एकूण ४५ विद्यार्थी असतानाही प्रत्येक वर्गात स्वतंत्रपणे २० विद्याथ्यांची अट पूर्ण होत नसल्यामुळे त्या शाळेला एकही शिक्षकपद मंजूर होणार नाही. सध्या दोन शिक्षकांवर शाळेचा कारभार सुरू असला, तरी सुधारित धोरणानुसार हे दोन्ही शिक्षक ‘अधिशेष’ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    Maharashtra TimesMumbai Local Train Updates: मुंबईकरांचा उद्या खोळंबा! मध्य-हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक
    ‘एकीकडे मराठी शाळांची संख्या कमी होत असताना, या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रद्द होत असताना, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार मुंबईतील अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा देत आहे. या परिस्थितीमुळे मराठी शाळा टिकल्या नाहीत, तर मराठी भाषा, संस्कृती व प्रादेशिक अस्मिता यांवर गंभीर परिणाम होईल. अनेक शाळांना आवश्यकता नसताना केवळ नफेखोरीसाठी अल्पसंख्याक दर्जा दिला जात आहे का, याची चौकशी व्हावी,’ अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.

    बंदच्या वाटेवरील शाळा
    पश्चिम मुंबई –३४
    उत्तर मुंबई –१९
    दक्षिण मुंबई –४
    मुंबई शहर व उपनगरात सर्व बोडांच्या मिळून १,७३६ शाळा
    मराठी शाळांची संख्या ३३७
    ८४ शाळा गेल्या वर्षांतच बंद

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed