भिगवण प्रकरणातील मुलीच्या आईने आमदार राहुल कुल यांच्यावर आरोप केला होता. राहुल कुल आरोपींनी मदत करत असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. या आरोपांवर आता राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तपासाची संपूर्ण माहिती मुलीच्या कुटुंबाला द्यावी तसेच त्यांना तपासात सहकार्य करावे, अशी मागणीही पोलिसांकडे केल्याचे त्यांनी नमूद केले. आपण संबंधित मुलीच्या मामांच्या संपर्कात असून आवश्यक ती मदतही करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणाला काही जणांकडून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दोषी कोणीही असो, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. आवश्यक असल्यास मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदत करण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राहुल कुल नेमकं काय म्हणाले?
“परवा भिगवण या ठिकाणी तरुणीची तक्रार आली. या प्रकरणात सातत्याने पोलिसांच्या संपर्कात राहून, त्याचबरोबर मुलीच्या मामाच्या आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहून, सातत्याने त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाने केला. काल त्या मुलीचा शोध होईपर्यंत पोलीस प्रशासनाला दर एक-दोन तासांनी मी फोन करत कारवाईच्या सूचना केल्या आहेत”, असं राहुल कुल म्हणाले.
“मुलगी मिळाल्यानंतर आज जे आरोप झाले त्याबद्दल मी एवढंच सांगेन की, या सगळ्या परिसरात काम करत असताना आम्ही सामाजिक जाणीवेतून काम करतो. त्यामुळे कुणी काही आरोप करत असतील तर मलाही नमूद करायचं आहे की, मलाही एक मुलगी आहे. माझ्या घरात महिला पदाधिकारी राहिलेल्या आहेत. त्यामुळे महिलांचा प्रश्न कशा पद्धतीने हाताळावा याची जाणीव मला आहे”, असंदेखील राहुल कुल म्हणाले.
“कदाचित आज कुणी स्टेटस ठेवला. हा जो विषय आहे, मी या प्रकरणात मुलीच्या बाजूने भक्कम भूमिका घेतल्यामुळे असं केलेलं असावं, असं माझं प्राथमिक मत आहे. पण या सगळ्या प्रकारणाची चौकशी करावी. त्याचबरोबर त्या मुलीचा शोध घ्यावा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी”, अशी मागणी राहुल कुल यांनी केली.
“आरोप करणाऱ्यांनी आधी वस्तुस्थिती तपासावी आणि मगच आरोप करावेत. अशी विनंती मी निश्चित करेन. त्या कुटुंबाविषयी आम्ही सर्वजण सहानुभूतीपूर्वक मदतीच्या भूमिकेत आहोत. त्या कुटुंबाला जी मदत लागेल ती करण्याच्या भूमिकेत आम्ही आहोत. प्रशासनाकडून मुलीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या कुटुंबाला जो पाठबळ आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे कुणी जर असा समज पसरलत असतील तर तुमच्याही घरात मुली आहेत आणि माझ्याही घरात मुली आहेत. वस्तुस्तिथीची जाणीव ठेवून आणि तपासून आरोप करावे, असं नम्र आवाहन मी सगळ्यांना करेन”, अशी भूमिका राहुल कुल यांनी मांडली.
