• Sat. Aug 8th, 2026

    माझी वसुंधरा अभियानातील स्पर्धेचा शनिवार २१ रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 19, 2026
    माझी वसुंधरा अभियानातील स्पर्धेचा शनिवार २१ रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    मुंबई, दि. १९:  पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी, मुंबई येथे दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.

    पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने राबविलेल्या ‘माझी वसुंधरा’अभियानाने राज्यात व्यापक जनसहभागातून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणारा हा पहिलाच एकात्मिक आणि अभिनव उपक्रम असून २ ऑक्टोबर २०२० पासून तो मिशन मोड पद्धतीने सुरू आहे.

    पर्यावरण क्षेत्रात पदाधिकाऱ्यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ व ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ चा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सन्मान सोहळा २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी, मुंबई येथे दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरण क्षेत्रात पदाधिकाऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि स्थानिक स्तरावर पर्यावरण चळवळ अधिक बळकट व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

    ‘माझी वसुंधरा अभियानांतर्गत’ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व ग्राम पंचायती या स्थानिक संस्थांमार्फत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या योजना प्रभावीपणे व मिशन मोड पद्धतीने राबविण्यासाठी दरवर्षी स्पर्धा घेतात व उच्चत्तम कामगिरी (विजेत्या) करणाऱ्या स्थानिक संस्थांना रोख रकमेचे बक्षिस देऊन गौरव करतात. माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील सर्व ४१८ नागरी स्थानिक संस्था आणि २७,८९९ ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या आहेत.

    गेल्या चार वर्षांत अभियानाअंतर्गत २९३.२७ लाख वृक्षलागवड करण्यात आली. ५२,४९७ हरित क्षेत्रांची निर्मिती व जतन करण्यात आले. राज्यात ३.९२ लाखांहून अधिक विद्युत वाहने वापरात आली आहेत. तसेच २८,०३५ पेक्षा अधिक पावसाचे पाणी झिरपविणारे शोषखड्डे तयार करण्यात आले असून त्यामुळे २२७.६० कोटी घनमीटर जलसंधारण क्षमता निर्माण झाली आहे. याशिवाय २,५०० हून अधिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. अभियानांतर्गत १०,२२६ बायोगॅस प्रकल्प आणि १,२३४ सौर पंप बसविण्यात आले असून सुमारे २०० मेगावॅटपर्यंत अपारंपरिक ऊर्जा क्षमता निर्माण करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविल्याचे मंत्री श्रीमती मुंडे यांनी नमूद केले.

    या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील विजेत्या स्थानिक स्वराज्य संस्था, या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्ति, शासकीय अधिकारी यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed