धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आरती पावरा या विवाहितेने दोन मुलांसह विष प्राशन केले, ज्यामध्ये…..
नेमकी घटना काय?
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आंबे ग्रामपंचायत हद्दीतील भिलटदेव पाडा येथे मन हेलावून टाकणारी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. येथील आरती संजय पावरा (वय ३०) या विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विषारी औषध प्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत विवाहिता आरती आणि तिचा तीन वर्षीय मुलगा चिराग यांचा मृत्यू झाला आहे, तर पाच वर्षीय मोठा मुलगा रिहांश याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. रिहांश सध्या मृत्यूशी झुंज देत असून, त्याच्यावर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एकाच वेळी आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सामूहिक आत्महत्या की हत्या?
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. प्राथमिक तपासात ही घटना संशयास्पद वाटत असून, ही सामूहिक आत्महत्या आहे की हत्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी संबंधित पतीची ही सातवी पत्नी असून यापूर्वी तिघा पत्नींची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली असल्याचा पतीवर गंभीर आरोप केला आहे.
Accident News: आई उद्या परत येतोय गं! ज्योतिर्लिंगाच्या दर्शनात १८ दिवस रमले, परत निघाले अन् नको तेच झालं, पुण्यातल्या तीन मित्रांचा गुजरातमध्ये अपघाती अंत
पतीला ताब्यात घेतले
या घटनेची दखल घेत शिरपूर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून, संशयित पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आता शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
