• Thu. Mar 12th, 2026
    Jalgaon Crime: दरमहा 20 हजार पोटगी टाळण्यासाठी नवऱ्याचा कट; पत्नीला संपवण्यासाठी दोन लाखांचा सौदा, घराला आगच लावली

    कोर्टाने दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिल्याने संतापलेल्या जळगावच्या एका पतीने पत्नीला संपवण्यासाठी चक्क २ लाखांची सुपारी दिली. नगरदेवळा येथे घराला आग लावल्याच्या घटनेचा तपास करताना जळगाव एलसीबीने या खळबळजनक कटाचा पर्दाफाश केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : कोर्टाने पत्नीला दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिल्यानंतर पतीने पत्नीला संपवण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावल्याच्या सणसणाटी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पीडित महिलेचा पतीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोटगी टाळण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी देऊन हा कट रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह एका आरोपीला अटक केली असून त्यांच्याकडून नऊ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

    दहशतीचे वातावरण

    या घटनेत फिर्यादी किरण उमेश राऊळ आणि त्यांची आई नगरदेवळा येथील घरी झोपलेल्या असताना दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधून घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोर्टाच्या आदेशामुळे पतीला पोटगी द्यावी लागणार असल्याने त्याने हा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले.

    ‘धडा शिकवण्यासाठी…’

    एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने हा गुन्हा फिर्यादीचा पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली. राहुल पाटील आणि त्याची पत्नी किरण राऊळ यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असून कोर्टाने राहुलला दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते.

    Maharashtra TimesIndapur Crime : तरुणीचं आई आणि भावासमोर अपहरण, इंदापुरात अतिशय भयानक आणि डोकं चक्रावणारी घटना

    त्या रागातून राहुलने पत्नीला धडा शिकवण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी एक लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते.

    आरोपी कुख्यात चोर

    दरम्यान, आरोपी गणेश पाटील याच्याकडून केवळ जाळपोळच नव्हे तर महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोटरसायकल चोरी केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून पाचोरा, जळगाव एमआयडीसी, भोकरदन, शेगाव रेल्वे, बोदवड तसेच सुरत येथील एकूण नऊ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

    Maharashtra TimesStrait of Hormuz: क्षेपणास्त्रं डागली, ‘तो’ मार्ग बंद; इराण जगाच्या गळ्याची नस दाबण्याच्या तयारीत; भारताला झळ बसणार

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेखर डोमाळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा