• Sat. Mar 7th, 2026
    Narhari Zirwal : नॉट रिचेबल मंत्री ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल, राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची आज बैठक बोलावल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी मंत्री नरहरी झिरवळ हे देखील दाखल झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : गेल्या चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ हे आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालातील कार्यालयात कार्यरत असलेल्या कारकुनास एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडलं. विशेष म्हणजे मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना कारकून राजेंद्र ढेरंगे याला रंगेहात पकडण्यात आलं. त्यामुळे या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. थेट मंत्रालयात लाच घेण्याचे सर्रास प्रकार घडत असल्याचं या घटनेतून उघडकीस आले. या घटनेपासून या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ हे नॉट रिचेबल होते. अखेर ते आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात आता खुद्द उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार काय कारवाई करणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे दर आठवड्याला त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची आणि त्यानंतर सर्व आमदारांची बैठक घ्यायचे. अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवार यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच ही बैठक पार पडत असल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीसाठी नरहरी झिरवळ दाखल झाल्याचीदेखील माहिती समोर आली आहे.

    मंत्री नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील एका कर्मचाऱ्याच्या विरोधात लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने कारवाई केल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी माध्यमांसमोर न येता मौन बाळगलेलं बघायला मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या प्रकरणावरुन सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावल्याची चर्चा आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील कर्माचाऱ्यावर झालेल्या कारवाईची माहिती जाणून घेणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणाबाबत नरहरी झिरवळ यांना काही सूचना दिल्या जातात का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. दरम्यान, आजच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील दाखल झाल्याची माहिती आहे.

    राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर चर्चा होण्याची शक्यता

    सुनेत्रा पवार यांनी बोलावलेल्या पक्षाच्या आमदार आणि नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर चर्चा होणार असल्याची देखील माहिती आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कधी बोलवायची? याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच पुढच्या 15 दिवसांत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची देखील चर्चा आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा