Nashik Young Businessman Drowns to Death : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुण उद्योजकाचा नर्मदा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरा त खळबळ उडाली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू
विजेंद्र घाटगे हे आध्यात्मिकातेशी जोडलेले होते. काही दिवसांपूर्वीच ते नर्मदा परिक्रमेला देखील गेले होते आणि त्यांनी आपली नर्मदा परिक्रमा देखील पूर्ण केली. त्यानंतर ते गुजरात राज्यातील शिनोर, बडोदा इथल्या बद्रिक या आश्रमात वास्तव्याला होते. दरम्यान, दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी ते नदीवर अंघोळीसाठी गेले होते. यावेळी आणखी काहीजण देखील त्यांच्यासोबत होते.त्यानंतर त्यांनी नदीपात्रात उडी घेतली आणि काही क्षणातच ते पाण्यात बुडायला लागले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने विजेंद्र यांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. दुर्दैव असं की विजेंद्र यांनी आपल्या समवेत असलेल्या कोणाला पोहता येत नसल्याचं सांगितलं नव्हतं आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांपैकी देखील कोणाला पोहता न येत नसल्याने त्यांच्या डोळ्यासमोर अगदी काही फुटांवरच विजेंद्र यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.
Beed News : महावितरणाचा निष्काळजीपणा निष्पाप जीवावर बेतला, विजेच्या धक्क्याने 15 वर्षीय मुलाचा करुण अंत
घटना कॅमेरात कैद
नदीपात्र खोल असल्याने शुक्रवारपासून बुडलेल्या विजेंद्र यांना शोधण्यासाठी दोन दिवस लागले. काल रविवारच्या दिवशी विजेंद्र यांचा मृतदेह हा नदीपात्रात सापडला. तरुण उद्योजकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कामटवाडे आणि नाशिक शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विजेंद्र यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी, मुलगी (वय 8 वर्ष) आणि मुलगा (वय 5 वर्ष) असा परिवार आहे. शहरातील एका तरुण उद्योजकाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण नाशिक शहरात सोबतच औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील याबाबत शोककळा पसरली आहे.
