• Fri. Mar 6th, 2026

    Pune News : महाशिवरात्रीच्या दिवशीच हरिचंद्रगडावर दुर्घटना, कड्यावरचा दगड घरंगळला अन् भाविकाच्या डोक्यावर कोसळला

    Pune News : महाशिवरात्रीच्या दिवशीच हरिचंद्रगडावर दुर्घटना, कड्यावरचा दगड घरंगळला अन् भाविकाच्या डोक्यावर कोसळला

    राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह असतानाच महाशिवरात्रीच्या दिवशीच हरिचंद्रगडावर दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळाला. राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावामध्ये लाखो शिवभक्तांनी शिव मंदिरात जावून दर्शन घेतलं. सर्वत्र उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. पण या उत्साहाला हरिचंद्रगड येथे गालबोट बघायला मिळालं. कारण एक अप्रिय घटना हरिचंद्रगडावर घडली. हरिचंद्रगडावर भगवान शिवाचं दर्शन घेऊन खाली उतरत असताना भाविकावर काळाने घाला घातला. गडावरुन खाली उतरत असताना अचानक एक दगड निसटला आणि तो भाविकाचा डोक्यावर आदळला. यानंतर दगड भाविकाच्या पाठिवर कोसळला. या दुर्घटनेत भाविकाचा मृत्यू झाला.

    सुरेश किसन दामसे असं मृतक भाविकाचं नाव आहे. ते 35 वर्षांचे होते. सुरेश हरिचंद्रगडावरुन दर्शन घेऊन खाली उतरत होते. पण याचवेळी कड्यावरचा सैल दगड अचावक खाली निसटला आणि त्यांच्या डोक्यावर आणि पाठिवर कोसळला. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि ते जागेवरच बेशुद्ध झाले.

    5 किमी पायी चालत भाविकाला उपचारासाठी नेलं, पण…

    या घटनेनंतर इतर भाविकांनी आणि स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीला धावले. हरिचंद्रगडावरुन खाली नेणं आणि वैद्यकीय मदतीसाठी घेऊन जाणं हे खूप कठीण कार्य होतं. मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्त आणि भाविकांनी दुर्गम आणि कठीण पायवाट असल्यामुळे पाच किमी पायी चालत खिरेश्वर गावात सुरेश दामसे यांना जखमी अवस्थेत आणलं गेलं. तिथून त्यांना पुढील उपचारासाठी नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुरेश यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

    सुरेश दामसे हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावचे रहिवासी होते. या घटनेमुळे दामसे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांकडून या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारे एखाद्या भाविकाचा मृत्यू कड्यावरील सैल दगड कोसळल्याने होत असेल तर प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. प्रशासन या घटनेची दखल घेऊन आगामी काळात खरंच काही कारवाई करतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा