Mulund Metro Accident: मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिका-४च्या कामादरम्यान सुरक्षा कठड्याचा भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वीची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये खांबाला भेग पडली असल्याचे पहिलेच दिसत होते असं दाखवलं आहे.
काही दिवसांपूर्वीच पोस्ट
या दुर्घटनेला एमएमआरडीएचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे की अजून काही या सर्वांबद्दल चर्चा सुरू असताना आता एक एक्स वरील पोस्ट व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका एक्स यूझरने मुलुंडमधील LBS मार्गावरील एका खांबाला तडे गेल्याचा फोटो शेअर करत MMRDA ला जाब विचारला होता. “एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहू नका, त्याची तक्रार करा. पुन्हा पोस्ट करा. अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा. मुलुंडमधील मेट्रोच्या खांबावर मोठी भेग पडली आहे,” असे लिहित त्या व्यक्तीने पोस्ट केली.
एमएमआरडीएचं स्पष्टीकरण
यावरती MMRDA ने ही पोस्ट आणी फोटो नागरिकांची दिशाभूल करणारे आहेत असे उत्तर दिले. ” या पोस्टमध्ये दिसणारी रचना मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावरील पोर्टल पियर पी189 वर एक बीम आहे. काँक्रीटीकरण करताना, ‘शटर गॅप्स सील’ करण्यासाठी आणि सिमेंट स्लरीची गळती रोखण्यासाठी फोम शीट्सचा तात्पुरता वापर करण्यात येतो. छायाचित्रांमध्ये जे दिसले ते या फोम मटेरियलचे अवशेष होते, स्ट्रक्चरल क्रॅक नव्हते. ही रचना सुरक्षित आणि संरचनात्मकदृष्ट्या मजबूत आहे आणि काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, ” असे स्पष्टीकरण यावेळी एमएमआरडीएने दिले होते.
आता या फोटोमध्ये दाखवला गेलेला खांबच काल कोसळला की हा वेगळा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, हे दोन्ही खांब मुलुंडमधील LBS मार्गावरील होते. “ही पोस्ट चुकीची माहिती पसरवून नागरिकांची दिशाभूल करत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही पोस्ट केली गेली आहे,” असेही MMRDA ने म्हटले आहे.
मुलुंडमधील काल झालेल्या दुर्घटनेनंतर ही पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे. एक्स यूझर्स याबद्दल स्पष्टीकरण मागत आहेत. काल झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
