Crime News: लग्नाच्या घाईगडबडीत घरात येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने चोरट्याला फायदा झाल्याची शंका पोलिस व्यक्त करत आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, जवळच्या हॉटेल्सकडून माहिती घेतली जात आहे.
कोल्हापुरात लग्नाच्या घाईगडबडीचा फायदा घेत चोरट्याने 28 लाख 50 हजार रुपयांच्या साडे 19 तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. ही घटना कोल्हापूरच्या रमणमळा पोस्ट ऑफिसजवळील एका बंगल्यात 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत घडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, पुण्याहून आलेल्या पुष्पा कुंदन राऊत (वय 49) यांचे 28 लाखांचे दागिने तर त्यासोबतच वेदांती डोईफोडे यांचे दीड तोळ्याचे दागिने चोरले गेले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, घरातील कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.
लग्नाच्या तयारीत दागिन्यांची बॅग लॉकरमध्ये
पुणे येथील वानवडी येथील पुष्पा राऊत यांची बहीण उज्ज्वला शिंदे या रमणमळा येथे वास्तव्य करतात. उज्ज्वला यांच्या मुलाचे लग्न 7 फेब्रुवारीला होणार असल्याने पुष्पा राऊत सहकुटुंब 31 जानेवारीला कोल्हापुरात दाखल झाल्या. त्यांनी सोबत 29 तोळे सोन्याचे दागिने आणले होते. लग्नाला आठ दिवसांचा अवधी असल्याने पुष्पा यांनी ही बॅग बहिणीची मुलगी कल्याणी भालकर यांच्याकडे लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दिली. याचवेळी वेदांती डोईफोडे यांनीही आपले दीड तोळ्याचे दागिने असलेली पर्स कल्याणी यांच्याकडे सुपूर्द केली. राऊत कुटुंब लग्नाच्या काळात हॉटेलमध्ये थांबले होते.
लग्नाच्या पूर्वसंध्येला पुष्पा राऊत दागिन्यांची पिशवी घेण्यासाठी बहिणीच्या घरी पोहोचल्या. लॉकरमधून पिशवी काढून लग्न समारंभासाठी निघाल्या. याचवेळी वेदांती डोईफोडे यांनी आपल्या दागिन्यांची विचारणा केली, मात्र पिशवीत दागिनेच नव्हते. ही बाब लक्षात येताच घरात त्यांनी खूप शोध घेतला, तरी दागिने सापडले नाहीत. लग्न पार पडल्यानंतर शुक्रवारी (13 फेब्रुवारी) पुष्पा राऊत यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
28 लाख 50 हजारांचे दागिने गायब
फिर्यादीनुसार, पुष्पा राऊत यांचे 28 लाख रुपयांचे दागिने लंपास झाले आहेत. यात साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, साडेचार तोळ्याच्या चार बांगड्या, साडेतीन तोळ्याचे दोन तोडे, दीड तोळ्याचे टेम्पल हार आणि अर्धा तोळ्याची अंगठी यांचा समावेश आहे. तर वेदांती डोईफोडे यांचे 1 तोळ्याचे झुमके आणि अर्ध्या तोळ्याची रिंग असे दीड तोळ्याचे दागिनेही गायब झाले आहेत. एकूण साडेएकोणीस तोळ्याच्या दागिन्यांची किंमत 28 लाख 50 हजार रुपये आहे.
ओळखीचे व्यक्ती चोरटे असण्याची शक्यता..
शाहूपुरी पोलिसांनी फिर्याद नोंदवली असून, घटनास्थळाची पाहणी केली आहे. घरातील लॉकर, खोल्या तपासल्या असता कोणतीही तोडफोड दिसली नाही. त्यामुळे घरातील कर्मचारी किंवा ओळखीचे व्यक्ती चोरटे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे सोन्या-चांदीचे दर गगणाला भिडत असताना चोरट्यांच्या देखील हालचाली वाढल्या आहेत. तर कोल्हापूर शहरात मोठमोठ्या समारंभामध्ये अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
