• Tue. Mar 10th, 2026
    Sanjay Kenekar : भाजप आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसमध्ये एअर गन ठेवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

    छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसांनी भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअर गन ठेवणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअर गन सापडल्याने मोठी खळबळ उडाली. संजय केनेकर यांच्या कार्यालयात एक तरुण शुक्रवारी (13 जानेवारी) आला होता. त्याच्याच बॅगेत ही एअर गन सापडली आहे. त्यामुळे तरुण ही एअर गन मुद्दाम तिथे विसरला का? त्याच्याकडून कुणाच्या जीवितास धोका होता का? त्याच्या मनात नेमका काय उद्देश होता? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअर गन सापडल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली.

    छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी तातडीने ती पिस्तूल जप्त केली आणि घातपाताच्या संशयातून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तातडीने कामाला सुरुवात केली. या तपासातून पोलिसांनी पिस्तूल ठेवणाऱ्या तरुणाला शोधून काढलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर तरुणाची ओळख पटवण्यात आली. रितेश संतोष होळकर असं एअरगन ठेवणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

    छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसांनी संतोष होळकर याला ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या तरुणाची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. पण त्याने ही गन कशासाठी घेतली होती? त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. रितेश संतोष होळकर याच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

    पोलीस काय म्हणाले?

    क्रांती चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “आज सकाळी भाजप आमदार संजय केनेकर यांच्या क्रांती चौकातील कार्यालयात एक काळी बॅग मिळाली. त्या बॅगमध्ये पिस्तूलसदृश्य अग्निशस्त्र असल्याची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो आणि पाहणी केली. आम्ही पाहणी केली असता तिथे एअर गन मिळाली जी छर्रेवाली होती. आम्ही रितसर पंचनामा करुन ती गन जप्त केली आहे. शोध घेतला असता ती एअर गन रितेश होळकर नावाच्या तरुणाने विकत घेतलेली. या प्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्याची कारवाई आहे”, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली.

    “रितेश होळकर त्याच्या वैयक्तिक कामांसाठी संजय केनेकर यांच्या कार्यालयात गेला होता. त्याने त्याची बॅग तिथे ठेवला आणि तिथून निघून गेला होता. या प्रकरणी आता तपास सुरु आहे. रितेश होळकर या तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. पण त्याने हे कृत्य का आणि कशासाठी केलं? याची आम्ही चौकशी करत आहोत”, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा