• Sat. Mar 7th, 2026

    राहुल नार्वेकर यांनी पळ काढलाय! हाणामारी कुठे आणि का झाली? संजय राऊतांनी VIDEO दाखवला

    राहुल नार्वेकर यांनी पळ काढलाय! हाणामारी कुठे आणि का झाली? संजय राऊतांनी VIDEO दाखवला

    शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. त्यात नार्वेकर आणि त्यांचे साथीदार पळ काढताना दिसत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड: विधानसभेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल नार्वेकर यांचा रायगडमधील एक व्हिडीओ शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला. तुम्ही सांगताय की मी सांगू?, असे प्रश्न राऊत यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत विचारले आहेत.

    खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेला व्हिडीओ अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावचा असल्याचं समजतं. या व्हिडीओमध्ये राहुल नार्वेकर आणि त्यांचे काही सहकारी दिसत आहे. त्यांचा गावातील काहींशी वाद सुरु असल्याचं दिसतं. शेत जमिनीच्या मोजणीवरुन हा वाद झाल्याचं बोललं जात आहे. ग्रामस्थ संतापताच नार्वेकर आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी तिथून काढता पाय घेतला.

    म्हात्रोळी गावात जमिनीची मोजणी केली जात होती. त्याला जमीन मालकांनी जोरदार आक्षेप घेतला. नार्वेकरांसोबत असलेल्या लोकांनी जमीन मालकांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पण जमीन मालकांनी त्यांना तिथून अक्षरश: पिटाळून लावलं. गावातील महिलेनं रुद्रावतार धारण केला. जा तू इथून. निघ लवकर. तुला त्या दिवशीच सांगितलं होतं ना, आतमध्ये शिरायचं नाही म्हणून. आम्ही घरात नाही ते बघून, संधी साधून आतमध्ये शिरलात काय तुम्ही, असं म्हणत महिला त्यांच्या मागेच लागली. तिचा आक्रमक पवित्रा पाहता नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथून पळ काढला.

    संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन गटांमधील वाद स्पष्ट दिसत आहे. आत शिरु नकोस, असं तुला सांगितलं होतं ना? आमच्या घरी साखरपुडा होता. तेव्हाही आणि आताही आम्ही घरात नसताना तू आलासच का? आम्ही घरात नसताना आतमध्ये शिरता का तुम्ही? आमची एवढी जागा गेली तरी.. फॉरेस्टमधील जागा किती काढली तुम्ही, अशा शब्दांत जमीन मालक नार्वेकर यांना प्रश्न विचारत आहे. यावेळी नार्वेकरांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो फोल ठरला. त्यानंतर नार्वेकर तिथून निघून गेले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा