• Sun. Jun 14th, 2026

    कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 12, 2026
    कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    सांगली, दि. 12, (जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने सक्रीय पुढाकार घेऊन कायद्याचा धाक निर्माण करावा, अशा सक्त सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.

    जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

    जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियान गेले वर्षभर सुरू आहे. याचा प्रभाव वाढविण्यासाठी पोलीस प्रशासनासह औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्रित धाड मोहिम हाती घ्यावी. महानगरपालिका क्षेत्रातील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणांची कडक तपासणी करावी, पोलीस दलाने गस्त वाढवून अधिकाधिक कठोर पावले उचलावीत. कोणाचीही गय करू नये, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

    पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने माहिती सादर केली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण  विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed