• Thu. Sep 10th, 2026

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करा- निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 12, 2026
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करा- निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे – महासंवाद

सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे होत आहे. यानिमित्त सांगली जिल्ह्यात या कार्यक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी दिले.

 ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस तहसिलदार लिना खरात, तहसिलदार पुनर्वसन वैष्णवी मंदरे-बिचकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल कदम, सिख समाजाचे भूपेंद्रसिंग, सिंधी समाजाचे जितेंद्र ठाकूर, शिवकुमार जुमराणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सिख व सिंधी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे म्हणाल्या, ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर सहिबजी यांचा 350 वी शहीदी समागम शताब्दी महोत्सव मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिर्मित्त श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा, तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान यांचे स्मरण होण्याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवन कार्यावर आधारित गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्याने, प्रभात फेरीचे आयोजन करावे.

            परिवहन व महामंडळाने कार्यक्रमांस जाणाऱ्या भाविकांसाठी वाहनाची व्यवस्था करावी. प्रत्येक गावात, तांडा वस्त्यावर कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी. जिल्ह्यात दररोज होणाऱ्या कार्यक्रमांचे छायाचित्र वेबसाईटवर अपलोड करावे. शाळा महाविद्यालयात सतिंदर सरताजचे गाणे व श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे जीवनकार्य क्लिप विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावी. कार्यक्रमांस स्थानिक लोकप्रतिनिधीना आंमत्रित करण्यात यावे. सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय या नऊ समाजातील समाज बांधवांनी समाजात व्यापक प्रचार प्रसिद्धी करावी. नऊ समाजाच्या नियमित बैठका घ्याव्यात.

            सतिंदर सरताज यांचे भक्तिगीत सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये जाहिरात फलक, डिजिटल प्रचार रथ, संत प्रवास वाहने, जागरण, प्रचार व प्रसार समित्या यांच्यामार्फत गुरू तेग बहादूर आणि त्यांच्या परिवाराच्या शहीदीचा इतिहास जनमानसात पोहोचविण्यात याव्यात तसेच व्यापक स्तरावर जनजागृती करावी. या सर्व उपक्रमांची माहिती नियमितपणे सादर करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी यावेळी दिले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *