Pune Cyber Fraud: विश्रामबाग पोलिसांनी सायबर फसवणूक, बनावट ओळख, धमकी व आर्थिक फसवणूक कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अतिरिक्त संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या आईच्या नावे पुण्यातील नवी पेठेत भाड्याने दिलेले घर आहे. भाडेकरूने ड्रेनेज तपासणीसाठी आलेल्या एका व्यक्तीशी बोलण्यास सांगितल्यानंतर, संदीप चव्हाण नावाच्या व्यक्तीने आपण महापालिकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून स्वतंत्र ड्रेनेजलाइन टाकण्याचा प्रस्ताव दिला. प्रारंभी ६५ हजार रुपये खर्च सांगून तक्रारदारांकडून ऑनलाइन रक्कम घेतली. त्यानंतर जून २०२५ पर्यंत तक्रारदारांकडून एकूण तब्बल सहा कोटी ७० लाख ३७ हजार ५०० रुपये उकळण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गेल्या काही दिवसांत विविध मार्गांनी, सरकारी अधिकारी, न्यायाधीश, पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अटकेची किंवा गंभीर कारवाईची भीती दाखवली जात असल्याने नागरिक घाबरतात आणि सायबर चोरट्यांच्या दबावाला बळी पडतात आणि ते म्हणतील त्या पद्धतीने पैसे देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक होऊन पैशांचा अपहार होत आहे. या प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे.
मशिन डिपॉझिट, महापालिका चलन, विविध विभागांचे शुल्क आदी कारणे देऊन आरोपींनी वारंवार पैसे उकळले. पैसे परत मिळतील अशी खोटी आश्वासने देऊन, बँक अधिकारी, पोलिस, न्यायाधीश असल्याची बतावणी करून धमकावणे आणि भावनिक दबाव टाकणे सुरू ठेवले. मुलाचे ऑपरेशन, मृत्यू, न्यायालयीन खर्च आदी खोट्या कारणांनी तक्रारदारांकडून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करून घेतले.
