सोलापुरात राजकीय वातावरण तापलं आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. राम सातपुते यांनी त्यांच्या या दाव्याला दुजोरा देत थेट विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.
राम सातपुते नेमकं काय म्हणाले?
“माझ्या हत्येचा कट रचण्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड असतील”, असा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. “माझ्या हत्येच्या कटासंदर्भात पोलिसांना अगोदरच माहिती मिळाली. त्यानुसार गेल्या 3 दिवसापासून पोलीस माळशिरस तालुक्यात तळ ठोकून आहेत. काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. कॉन्ट्रॅक्ट किलिंग करण्याचा प्रकार होता. याबाबत आपल्या हत्येत कोण कोण असू शकते? या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना चिठ्ठी दिली आहे”, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.
‘मुर्दाड माणसाला कोण मारणार?’, उत्तम जानकरांची तिखट प्रतिक्रिया
आमदार उत्तम जानकर हे बुधवारी दुपारी सोलापुरात आले होते. माध्यमांसमोर बोलताना जानकर यांनी थेट सवाल उपस्थित केला. मुर्दाड माणसाला कोण मारणार? असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये धराधरी, पकडापकडी अशा घटना घडतात. त्यात काही फार मोठा विषय नसतो, असे त्यांनी म्हटले. पालकमंत्र्यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल अधिक माहिती त्यांनाच असेल, असे सांगत जानकरांनी आरोपांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. माजी आमदाराच्या हत्येचा कट कोण रचेल आणि कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आमदार उत्तम जानकर पुढे म्हणाले की, राम सातपुते यांनीच आगावपणा केला. गुलालाची पिस्तूल बाबा माने यांच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर रागाच्या भरात एकमेकांमध्ये धराधरी झाली. निवडणुकीच्या वातावरणात अशा घटना घडत असतात. या प्रकाराला हत्येच्या कटासारखे स्वरूप देणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुर्दाडाला कोण मारणार आणि कशासाठी? असे म्हणत त्यांनी या आरोपांवर उपरोधिक प्रतिक्रिया दिली.
धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले?
“माळशिरस तालुक्यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांना फक्त एकच विजय मिळाला. या विजयाचा जल्लोष करत असताना माळशिरस तालुक्यामध्ये माढा मतदारसंघांमध्ये पराभव झाल्याने वैफल्यग्रस्त माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यामुळे असे विधान करत असतात. इलेक्शन झालं की यांचा पराभव निश्चित असतो. सपाटून आपटतात आणि नंतर त्याच्या बुद्धीवर परिणाम झाल्यानंतर असे वैफल्यग्रस्त विधान हे करत असतात. राम सातपुते स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्यासाठी वारंवार मोहिते पाटलांवर असे आरोप करत असतात. आम्हाला त्याची सवय आहे. आम्ही त्यांचा जास्त विचार करत नाहीत”, असं प्रत्युत्तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलं.
