• Thu. Jun 18th, 2026

    आरोग्य, पाणी पुरवठा, जलसंधारणसह पायाभूत सुविधांसाठी वाढीव 346 कोटींची मागणी करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई  – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 11, 2026
    आरोग्य, पाणी पुरवठा, जलसंधारणसह पायाभूत सुविधांसाठी वाढीव 346 कोटींची मागणी करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई  – महासंवाद

    सातारा दि.11 : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 2026-27 साठी मंजूर नियतव्यय 524 कोटी 56 लाखांचा असून आरोग्य, विद्यूत, पाणी पुरवठा, जलसंधारण यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वाढीव 346 कोटी 46 लाखांची मागणी राज्यस्तरीय समितीकडे करण्याची शिफारस पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

    जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, समाजकल्याण आयुक्त सुनिल जाधव, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

    यावर्षी सन 2025-26 मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 647 कोटी रुपयांचा निधी अर्थ संकल्पित आहे. यापैकी 31 जानेवारी 2026 अखेर एकूण 46.49 टक्के निधी यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. मागणीप्रमाणे यंत्रणांना ताबडतोब निधी उपलब्ध करुन दिला जाईल. यंत्रणांनी त्यांच्याकडील झालेल्या कामाची देयके तातडीने निपटारीत करावीत, असे निर्देशही या बैठकीत देण्यात आलेत.

    या बैठकीत विभागांकडील विविध कामांचा व झालेल्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनच्या ज्या कामांची चौकशी करण्यात येऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. अशा प्रकरणांमध्ये चौकशीअंती काही गैर आढळून आले नसल्यास बंद ठेवण्यात आलेली कामे सुरु करण्याचे निर्देशही देण्यात आले. वन विभागाच्या हद्दीत असणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत त्यांची यादी तयार करुन जिल्हाधिकारी यांचेकडे द्यावीत. त्यांनी यावर मार्ग काढावा, असेही बैठकीत सांगण्यात आले.

    दि. 12 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बैठक होणार असून या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठीचे नवनवीन उपक्रम, मॉडेल स्कूल, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. वाढीव वस्त्यांना विद्युत कनेक्‍शन, विद्युत पोल, वाढीव रस्ते, रस्ते सुधारणा, आरोग्य पाणीपुरवठा, जलसंधारण आदी सर्व बाबींमधील कामासाठी राज्य सरकारकडे वाढीव निधीची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आचार संहितेच्या काळात प्रलंबित राहिलेली कामे आता गतीने पूर्ण करावीत. एकही रुपयाचा निधी अखर्चित राहणार नाही याचे यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

    पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या
    पाटण विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न जलदगतीने जागेवर सोडविण्यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर विभाग प्रमुखांनी सकारात्मक निर्णय घेऊन अर्जदारास दिलासा द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जय‍ंत शिंदे, अभय काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

    पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमांतर्गत 156 गावांना भेटी देऊन 5 हजार 86 अर्ज प्राप्त, 2 हजार 400 अर्जावर कार्यवाही करण्यात आली असून 1 हजार 696 अर्ज प्रलंबित आहेत. या प्रलंबित अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. ज्या अर्जांवर निर्णय जिल्हास्तरावर घेता येईल असे जिल्हास्तरावर पाठविण्यात यावेत. तसेच ज्या अर्जदाराचे काम नियमात बसत नाही त्या अर्जदाराला लेखी कळविण्यात यावेत. या कामासाठी तालुकास्तरावर प्रांताधिकारी सोपान टोनपे व जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम करावे, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पाटण तालुक्यातील महिला लाभार्थ्यांचे ई-केवायसी चुकली आहे. त्यांची ई-केवायसी दुरुस्त करावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज आले आहेत या अर्जांवर एक महिन्याच्या आत कार्यवाही करावी. पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाला पाटण तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना सोयी-सुविधा व विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाचा सहभाग महत्वाचा आहे. त्या दृष्टीने पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांचा तातडीने निपटारा करावा, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed