• Tue. Mar 10th, 2026

    पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग पायलटच्या निर्णयामुळे जीवितहानी टळली

    ByMH LIVE NEWS

    Feb 10, 2026
    पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग पायलटच्या निर्णयामुळे जीवितहानी टळली
     पालघर
    तांत्रिक बिघाड झाल्याने एका हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना केळवे रोड परिसरात घडली आहे. पायलटने प्रसंगावधान राखत शाळेच्या खुल्या मैदानात हेलिकॉप्टरची लँडिंग सुरक्षितपणे केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

    नेमकं काय घडलं?

    सुरत येथे सरावासाठी एक हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथून निघाले होते. पालघर जिल्ह्यातील केळवे रोड, सफाळे दरम्यान आल्यानंतर या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा सिग्नल मिळाला. पायलटच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याने तातडीने परिसरात जवळच असलेले खुले मैदान शोधले. त्यानंतर या हेलिकॉप्टरची केळवे रोड येथील विद्या वैभव हायस्कूलच्या खुल्या मैदानात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. शाळेच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरले असल्याची बाब स्थानिकांनी पाहिल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. सफाळे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदतीबाबत हेलिकॉप्टर मधील पायलट व इंजिनिअर यांना विचारणा करण्यात आली.

    चार जण वाचले

    दरम्यान हेलिकॉप्टर मधील पायलट आणि इंजिनिअर यांनी तांत्रिक पथकाशी विमानामधील बिघाडा बाबत संपर्क साधला. त्यानंतर हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर सुरतच्या दिशेने न जाता जुहू येथील मुख्य कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये ज्युनियर पायलट, सीनियर पायलट, इंजिनियर तसेच आणखी एक व्यक्ती असे एकूण चार जण प्रवास करत होते.

    हेलिकॉप्टरच्या पायलटने प्रसंगावधान राखत वेळीच खुल्या मैदानात हेलिकॉप्टर लँड केल्याने मोठा अनर्थ टळला. शाळेच्या मैदानात उतरलेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.

    जुहूकडे पुन्हा रवाना

    तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर आपत्कालीन परिस्थितत केळवे रोड येथील शाळेच्या मैदानात उतरवण्यात आले होते. तांत्रिक बिघाड दुरुस्त करून पुन्हा हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहूकडे रवाना झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अशी माहिती सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed