Sangli Khanapur ZP Election Result 2026: सांगलीतील खानापुरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला जबर धक्का दिला आहे.
खानापुरातील जिल्हा परिषदेच्या चारही जागा आणि पंचायत समितीच्या आठही जागा शिंदेसेनेनं जिंकल्या. इथे भाजपला भोपळाही फोडता आलेला नाही. आमदार सुहास बाबर यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत भाजपला थेट अंगावर घेतल्यानं खानापुरातील निवडणूक निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. इथे शिंदेसेनेनं ताकद दाखवून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा बाबर यांनी पक्षाला जिंकून दिल्या आहेत. तर भाजपची पाटी कोरी राहिली आहे.
आमदार सुहास बाबर यांच्या वहिनी डॉ. शीतल बाबर या नागेवाडी जिल्हा परिषद गटातून निवडून आल्या. खानापूर तालुक्यात बाबर यांनी पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिला. यानंतर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खानापुरात भाजप ची पाटी कोरी राहिली आहे. भाजप राज्यभरात मुसंडी मारत असताना खानापुरात बाबर यांच्या माध्यमातून शिंदेसेनेचं वर्चस्व राखलं आहे.
निवडणुकीच्या प्रचार सभेत आमदार सुहास बाबर यांनी भाजपला थेट लक्ष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर तोफ डागली. खानापुरात दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस आपणच चालवतो, असं विधान बाबर यांनी केला. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बाबर यांना समज द्यावी. त्यांच्या आमदारकीची पहिली टर्म शेवटची ठरु नये, अशा शब्दांमध्ये मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केला. खानापुरातील निकालानंतर बाबर भाजपला जड गेल्याची चर्चा आहे.
