उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे ते आता पुन्हा विधान परिषदेवर जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
संख्याबळाच्या कमतरतेमुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेची निवडणूक जिंकणं हे मोठं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे संख्याबळ पाहता विधान परिषदेच्या 9 जागांपैकी महाविकास आघाडीला केवळ एकच जागेवर यश मिळू शकतं. ती एक व्यक्ती उद्धव ठाकरे असतील का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे हे स्वत: विधान परिषदेवर जाणार की दुसऱ्या कुणाला संधी देणार? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेवर जाण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं, अशी आमची सर्वांची इच्छा आहे, असंदेखील संजय राऊत म्हणाले. तसेच विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत मविआला एकमेकांना मदत करावी लागेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील याबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे यांना विधीमंडळात जाण्यासाठी आता मध्ये कुठली निवडणूक नाही. विधीमंडळात जायचंच असेल तर विधानसभेचं मागचं दार ज्याला म्हणतात त्या विधान परिषद निवडणुकीचा पर्याय त्यांना आहे. मला वाटतं ते त्या मार्गाने परत विधान परिषदेवर जातील. संख्याबळाचं गणितं पााहता इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तर ते विधान परिषदेत जातील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
संख्याबळानुसार नेमकं गणित काय?
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संख्याबळ पाहिलं तर महायुतीकडे 235 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे 7 आमदार सहज निवडणुकीत जिंकून येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडे माकप आणि शेकापचे पकडून 48 आमदार आहेत. तसेच अन्य दोन पक्षांचेदेखील आमदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे विधानसभेचे 20 सदस्य आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा काँग्रेसला पाठिंबा दिला तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
