CSMIA Airport: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व चेक इन काऊंटरचं स्वरूपातबदलणार आहेत. सन २०२८ पर्यंत २१२ काऊंटरमध्ये हा बदल पूर्ण होईल. यामुळे प्रवाशांना जलद सेवा मिळेल आणि वेळेची बचत होईल.
प्रवाशांच्या वेळीची बचत होणार
प्रवासी अधिकाधिक प्रमाणात सेल्फ सर्व्हिस बॅगेज सुविधांचा वापर करत आहेत. त्यामुळे या काऊंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. सन २०२४मध्ये तीन लाख ८८ हजार प्रवाशांनी या सुविधेचा मुंबई विमानतळावर लाभ घेतला होता. तर, सन २०२५मध्ये पाच लाख ६० हजारांहून अधिक प्रवाशांनी ही सुविधा वापरली. चेक इन आणि बॅगेज ड्रॉपेज ही सुविधा प्रवाशांना एकाच प्रक्रियेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतीक्षा करण्याचा वेळ वाचतो.
Metro Line 14: कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रोला चालना, 2026 मध्येच MMRDA करणार काम सुरू; ऐरोली, शीळफाटा, अंबरनाथ… कुठे असतील स्थानके?
मानवी प्रक्रियेच्या माध्यमातून २५ ते ३० प्रवाशांच्या सामानाची हाताळणी होत असताना सेल्फ सर्व्हिसच्या माध्यमातून १०० ते १२० प्रवाशांच्या सामानाची हाताळणी होऊ शकते, असेही निदर्शनास आले आहे. हायब्रिड यंत्रणेच्या माध्यमातून सेल्फ सर्विस आणि मानवी सेवा अशा दोन्ही पद्धतीने यंत्रणा कार्यान्वित राहते. ही सेवा त्या-त्या वेळच्या गरजेनुसार होऊ शकते.
कशी असेल सेवा?
सध्या इंडिगो व एअर इंडियाने टी२ येथे हायब्रिड सेल्फ बॅग ड्रॉप यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. लुफ्थान्सा, एअर फ्रान्स, कतार, स्विस आणि केएलएम या आंतरराष्ट्रीय विमानसेवाही स्वतंत्र सेल्फ बॅग ड्रॉप सुविधेचा वापर करत आहेत. या सेवा लवकरच हायब्रिड सेल्फ ड्रॉप सुविधेचा अवलंब करतील. हायब्रिड सेल्फ बॅग ड्रॉप यंत्रणा डिजियात्रा बायोमेट्रिक तंत्रज्ञानाशीही जोडणे शक्य आहे. यामुळे नोंदणीकृत प्रवाशांना फेशिअल रेकग्निशनच्या मदतीने कागदपत्र तपासणीमध्ये कमी वेळ घालवावा लागेल.
