• Tue. Jun 30th, 2026

    फेसबुवर ओळख, प्रेमाचा सापळा रचत लग्नाचं आमिष, लॉजमध्ये महिलेवर अत्याचार

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    फेसबुवर ओळख, प्रेमाचा सापळा रचत लग्नाचं आमिष, लॉजमध्ये महिलेवर अत्याचार

     अहिल्यानगर 

    सोशल मीडियावरील आभासी नातेसंबंध किती घातक ठरू शकतात, याचं एक धक्कादायक उदाहरण अहिल्यानगर शहरात समोर आलं आहे. फेसबुकवरून ओळख वाढवून प्रेम व लग्नाचे खोटे आश्वासन देत एका 33 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असून, संबंधित तरूण अत्याचारानंतर पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.

    तुझ्याशिवाय राहू शकत नाही..

    कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, जालना जिल्ह्यातील राजु भाऊराव काकडे ऊर्फ सुनील पटेल या तरूणाशी पीडित महिलेचा फेसबुकच्या माध्यमातून संपर्क झाला. सुरुवातीला साध्या संवादातून सुरू झालेली ओळख पुढे मैत्रीत, आणि नंतर प्रेमसंबंधात रूपांतरित झाली. ‘तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुझ्याशीच लग्न करणार’, अशा भावनिक पद्धतीने तरूणाने महिलेचा विश्वास संपादन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    पीडित महिला विवाहित असून तिला चार मुले आहेत. पती व कुटुंबासोबत राहत असतानाही सोशल मीडियावरील सततच्या संवादामुळे संबंधित तरूणावर तिचा विश्वास बसला. या विश्वासातूनच तिने घरच्यांना काहीही न सांगता त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. 1 फेब्रुवारी रोजी रात्री तरूणाने अहिल्यानगरला आल्याचं सांगून महिलेला भेटण्यास बोलावलं. त्यानंतर दुचाकीवरून तिला छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आलं. तेथे एका लॉजमध्ये मुक्काम करत लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

    प्रेम व लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक

    घटनेनंतर सकाळी ‘चहा आणतो’, असं सांगून तरूण महिलेचा मोबाईल घेऊन बाहेर गेला आणि तो पुन्हा परतलाच नाही. बराच वेळ वाट पाहूनही संपर्क न झाल्यानं महिला घाबरली. अखेर तिने छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, महिलेच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेला ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केली असता, प्रेम व लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक व अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानुसार राजू काकडे याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरून निर्माण होणाऱ्या आभासी नात्यांमधील धोके पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *