• Tue. Jun 30th, 2026

    भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू
    मिरा-भाईंदर
    भाईंदर परिसरात नागरिकांवर हल्ला करणाऱ्या चार वर्षीय नर बिबट्याचा सोमवारी मृत्यू झाला. हा बिबट्या डिसेंबरमध्ये जेरबंद केल्यानंतर नैसर्गिक अधिवास असलेल्या येऊरच्या जंगलात सोडण्यात आला होता. येऊर वनक्षेत्रातील नागला परिसरात त्याचे शव आढळून आले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.भाईंदर पूर्वेतील तलाव रोड या वर्दळीच्या भागात १९ डिसेंबरला सकाळी बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर त्याने एका इमारतीत शिरून सात जणांवर हल्ला केला होता. या घटनेत अनेक नागरिक गंभीर जखमी झाले होते. सुमारे सात तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वन विभागाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर २५ डिसेंबरला येऊर वनपरिक्षेत्रातील परिमंडळ नागला भागात बिबट्याला मुक्त करण्यात आले होते. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाइट ट्रॅकिंग कॉलर लावण्यात आला होता. त्यानंतर तो नियमित जंगलात शिकार करत असल्याचे आणि सुदृढ असल्याचे निरीक्षणात आले होते.

    २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सॅटेलाइट कॉलरद्वारे बिबट्याची प्रकृती चिंताजनक असल्याचा संदेश वन विभागाला मिळाला. त्यानंतर पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.तपासणीदरम्यान त्याची नखे, दात व इतर महत्त्वाचे अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. मंगळवारी शवविच्छेदन करून वैद्यकीय नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

    अहवालाची प्रतीक्षा
    बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याने शरीरातील विविध भागांचे नमुने पुढील परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल मिळण्यासाठी किमान आठवडा ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. या अहवालावर आणखी पुढील परीक्षण करायचे का, हे अवलंबून असेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed