• Tue. Jun 30th, 2026

    नदीच्या मधोमध पूल उभारला, विरार-डहाणू चौपदरीकरण सुरू

    ByMH LIVE NEWS

    Feb 5, 2026
    नदीच्या मधोमध पूल उभारला, विरार-डहाणू चौपदरीकरण सुरू
    मुंबई
    नदीच्या मधोमध पूल बांधताना साहित्याची ने-आण करण्यासाठी नदीकिनाऱ्यावरून पात्राच्या मध्यपर्यंत तात्पुरते मार्ग बनवावे लागतात. यामुळे नदीच्या पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम होतो. मात्र विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या कामात, वैतरणा नदीचा पर्यावरणीय ऱ्हास टाळण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या युक्तीने मार्ग शोधला आहे. यासाठी विशेष रो-रो ट्रॉली तयार करून त्यावरून सामानाची ने-आण करण्यात आली. यामुळे पर्यावरणीय ऱ्हास टाळून पूल क्रमांक ९२ आणि ९३ या महत्त्वाच्या टप्प्यासह चौपदरीकरणाचे निम्मे काम पूर्ण झाले आहे.एमयूटीपी-तीन अंतर्गत विरार-डहाणू रोडदरम्यान चार रेल्वे मार्गिका तयार करण्यासाठी वैतरणा नदीवर क्रमांक ९२ आणि ९३ हे महत्त्वाचे पूल आहेत. सध्या दोन मार्गिकांचा नवा पूल तयार करण्यात येत आहे. नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाल्यावर जुन्या पूलावरील वाहतूक बंद करून त्याचे पाडकाम करण्यात येईल. क्र. ९२ या पुलाचे १९.०५ मीटर लांबीचे ३३ स्पॅन आहेत, तर क्र. ९३ या पुलाचे तेवढ्याच लांबीचे २७ स्पॅन आहे. नदीपात्राच्या मध्यभागी जाण्याकरिता पर्यायी मार्गाचा अभाव हे पूल उभारणीतील सर्वांत मोठे आव्हान होते.

    नदीलगत दलदलीसदृश्य भाग असल्याने रस्ता उपलब्ध नाही. यामुळे मालवाहतुकीसाठी रुळांवरून धावणाऱ्या ट्रॉलीची प्रथमच निर्मिती करण्यात आली. नदीवर असलेल्या डीएफसी पुलाच्या रुळांवर ही ट्रॉली चालवण्यात आली. त्यावरून ट्रकमध्ये भरून मालाची ने-आण करण्यात आली. यामुळे कमीत कमी वेळेत नदीपात्राला धक्का न लावता पुलाचे काम सुरू आहे.

    टॉप स्लॅबसह गर्डर

    टॉप स्लॅबसह दोन गर्डर अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने गर्डरची उभारणी करण्यात आली. त्याचे वजन सुमारे २०८ टन आहे. हे गर्डर ट्रॉलीवरून पुलाजवळ आणण्यात आले. क्रेनचा वापर करून ६५ मीटर लांबीच्या गर्डर लॉन्चरच्या मदतीने त्याची उभारणी करण्यात आली. ट्रॉलीआधारित वाहनांमुळे क्रेनची वारंवार मदत घेण्याची गरज न पडता, काम पूर्ण झाले.

    विशेष डिझाइनने खांबाची निर्मिती

    नदीत खोल पायासाठीच्या खोदकामासाठी विशेष यंत्रणा तयार करण्यात आली. या ‘पाइल बोरिंग गॅन्ट्री’ यंत्रणेला रिसर्च डेव्हलपमेंट अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने याला मान्यता दिली आहे. चार टन वजनी हातोड्यांच्या मदतीने छेदणे आणि उपसणे अशा पद्धतीने २५ ते ३० मीटर खोलीपर्यंत अचूकपणे खांब उभारण्यात आले. पूल क्र. ९३ मध्ये चार यंत्रणा बसवून एकूण १६ खांबाचे बांधकाम एकाचवेळी शक्य झाले. एक हजार २०० मिमी व्यासाच्या आठ खांबांचा समूह यात आहे.

    Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकवर वॅगनआर कार आदळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू
    ११ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    ‘एल निनो’चे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती; कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed