• Tue. Jun 30th, 2026

    मातेच्या शोधासाठी नेदरलँडचा महापौर नागपुरात, चित्रपटाला शोभेल अशी खरीखुरी कहाणी

    ByMH LIVE NEWS

    Feb 5, 2026
    मातेच्या शोधासाठी नेदरलँडचा महापौर नागपुरात, चित्रपटाला शोभेल अशी खरीखुरी कहाणी
    नागपूर 
    आपल्या मुळांना शोधत नेदरलॅण्ड्सच्या हिमस्टेड शहरातील भारतीय वंशाचा मुलगा नुकताच नागपुरातील ज्या अधीक्षिकेने त्याला नवजात असताना वाढविले, तिला येऊन भेटला. या भेटीने आपुलकीच्या माणसांप्रती असलेली त्याची जिव्हाळ्याची नाळ अजूनही किती पक्की आहे, हे सिद्ध झाले. विशेष म्हणजे आज हा मुलगा हिमस्टेडचा महापौर आहे. त्यांचा प्रवास इथे थांबत नाही. ते आजही आपल्या जन्मदात्री आईचा शोध घेत आहेत.अगदी चित्रपटाला शोभेल अशी ही कथा खरीखुरी आहे आणि त्या ४१ वर्षीय मुलाचे नाव आहे फाल्गुन बिनेनडिक. आजपासून जवळपास ४० वर्षांपूर्वी १० फेब्रुवारी १९८५ रोजी नागपूरमध्ये जन्मलेल्या या नवजात बाळाच्या नशिबी अवघ्या तीन दिवसांतच पोरकेपण आले. रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरविली आणि तो चिमुकला जीव नागपूरमधील एका अनाथाश्रमात दाखल झाला.

    आयुष्याची सुरुवातच अनिश्चिततेने झाली होती. सुमारे एक महिना त्या अनाथाश्रमात राहिल्यानंतर नेदरलॅण्ड्समधील एका डच दाम्पत्याने या बाळाला दत्तक घेतले. सातासमुद्रापारनेदरलॅण्ड्सला नेले. तिथे फाल्गुनला केवळ घरच नाही तर प्रेम, सुरक्षितता आणि स्वतःची ओळखही मिळाली. आज, तब्बल ४१ वर्षांनंतर, तोच अनाथाश्रमातील फाल्गुन नेदरलॅण्ड्समधील हिमस्टेड या शहराचा महापौर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

    परदेशात यश, प्रतिष्ठा आणि ओळख मिळवूनही त्यांच्या मनात जन्मभूमीची ओढ कायम होती. याच ओढीपोटी फाल्गुन पुन्हा भारतात, आपल्या जीवन कहाणीच्या सुरुवातीच्या ठिकाणी नागपुरात आले. ज्या अधीक्षिकेने त्यांना तान्हुले असताना सांभाळले, त्यांना ते खास येऊन भेटले. मंगला भुसारी असे या अधीक्षिकेचे नाव आहे. या वेळी दोघांनाही झालेला आनंद शब्दात वर्णन करता न येणाराच होता. फाल्गुन महिन्यात जन्म झाला म्हणून मुलाचे नाव अधीक्षिकेने ‘फाल्गुन’ ठेवले होते.

    आईवर राग नाही

    ते आजही आपल्या जन्मदात्री आईचा शोध घेत आहेत. तान्हे असताना टाकून गेल्याचा राग कोणत्याही जिवाला येणारच. पण फाल्गून म्हणतात, माझ्या मनात कसलाही राग नाही आणि कुणाविषयी तक्रारही नाही. तुझा मुलगा सुरक्षित आहे एवढेच मला सांगायचे आहे असे ते सांगतात. या भेटीने आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण होईल, अशी भावना फाल्गुन व्यक्त करतात. त्यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालायात अनाथगृह होते, इथेच फाल्गुन यांचे पालनपोषण झाले. जिल्हाधिकीर डॉ. विपीन इटनकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून फाल्गून यांच्या आईचा शोध घेतला जाणार आहे, असे जिल्हा बालसंरक्षण अधिकीर मुस्ताक पुठाण यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed