शिवसेना आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली. त्यांच्या टीकेला आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी गिरीश महाजन चांगलेच संतापलेले बघायला मिळाले.
“मी आताच आपल्या चॅनलवर बघितलं. सुहास बाबर ज्या भाषेत बोलत आहेत, ही त्यांची पहिलीच टर्म आहे. शिवसेना नेते अनिल बाबर हे माझे चांगले मित्र होते. गेल्या 35 वर्षांपासून मी सदनात आहे आणि ते सुद्धा अनेक वर्षांपासून निवडून आले होते. पण त्यांचे चिरंजीव सुहास बाबर ज्या भाषेत बोलत आहेत ते पाहून आश्चर्य वाटलं. मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी भाषेत बोलले आहेत. मला वाटतं अजून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यावर ते असं म्हणत आहेत की, तेच सर्व पक्ष चालवत आहेत. सर्व पक्ष माझ्या खिशात आहे, असं त्यांचं म्हणणं अतिशय चुकीचं आहे”, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली.
“ते मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत बोलत आहेत हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्या राजकारणाची अजून सुरुवात आहे. ते वर्ष-दीड वर्ष भरापूर्वी निवडून आले आहेत. त्यांनी तोलूनमापून बोललं पाहिजे. त्यांना काय बोलावं? ते लहान आहेत, नवीन आहेत. पण मला वाटतं की, त्यांनी थोडं राजकारण समजून घ्यावं. अनिल बाबर साहेब देखील आमच्या बरोबर होते. पण त्यांचा कधीच असा तोल गेला नाही ते मी आजपर्यंत बघितलं आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“सुहास बाबर अशा पद्धतीने बोलत आहेत, मला वाटतं त्यांना एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. नाहीतर सुरुवातीलाच शेवट होईल. तुम्ही असं समजू नका की, सर्व तुमच्या खिशात आहे. भाजपला तुम्ही काय खिशात घेता? भाजपला तुम्ही काय चालवता? तोलूनमापून बोललं पाहिजे. फार हवेत राहता कामा नये. आपली पहिली टर्म आहे. शेवटची ठरता कामा नये”, अशा इशारा गिरीश महाजन यांनी दिला.
गिरीश महाजन यांचं नाशिकच्या पक्षांतर्गत घडामोडींवर भाष्य
दरम्यान, गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पक्षांतर्गत राजकीय घडामोडींवर देखील यावेळी प्रतिक्रिया दिली. “नाशिकमध्ये निवडणुकीच्या वेळी काही वाद झाले. स्थानिक नेत्यांची नाराजी आणि थोडा गोधळही झाला. एबी फॉर्म पळवापळवी झाली. प्रवेश करताना सुद्धा काही गोंधळ झाला. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण राजकारणात सर्व शंभर टक्के गोष्टी मनासारखे होतात, असं नसतं. एखादा विषय मनाविरोधात गेला की, त्या विरोधात आपण संताप, राग व्यक्त करावा हेही योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यांनी सर्वांना त्या बाबतीत सूचना दिलेली आहे”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
