• Mon. Sep 21st, 2026

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: ही एक चूक केल्यास गाडी जप्त होणार आणि तुमचा फोटोही व्हायरल केला जाणार, काय आहे नवा नियम?

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: ही एक चूक केल्यास गाडी जप्त होणार आणि तुमचा फोटोही व्हायरल केला जाणार, काय आहे नवा नियम?

Pune Police: रस्ते अपघात रोखण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडवर असून तळीरामांना आक्रमक शब्दांत इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना आता चांगलाच दणका बसणार आहे.

pune traffic(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कडक भूमिका घेतली असून दोनदा मद्यपान करून वाहन चालवल्यास तिसऱ्यांदा पकडलं गेल्यास वाहन जप्त केलं जाणार आहे. तसंच नियम मोडणाऱ्यांची छायाचित्रे थेट समाजमाध्यमांवर प्रसारित केली जाणार आहेत. शिवाजीनगर येथे आयोजित शिबिरात पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हा इशारा दिला आहे. ‘मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, दोन वेळा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ प्रकरणात कारवाई झाल्यानंतर तिसऱ्यांदा तोच प्रकार केल्यास संबंधित व्यक्तीचे वाहन जप्त करण्यात येईल,’ असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला.

‘नियमभंग करणाऱ्या मद्यपी वाहनचालकांची छायाचित्रे संकेतस्थळे आणि समाजमाध्यमांवर प्रसारित केली जातील. ही छायाचित्रे त्यांच्या मित्रपरिवारासह कुटुंबीयांनाही पाठवण्यात येतील. भर चौकात पोलिसांच्या शैलीत मद्यपी वाहनचालकांचा खास सत्कार केला जाईल, याची सर्वांनी जाणीव ठेवावी,’ असेही अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत आयोजित समुपदेशन व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. या शिबिरासाठी मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई झालेल्या एक हजार वाहनचालकांना बोलावण्यात आले होते. या वेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते.

अमितेशकुमार म्हणाले, ‘मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे अनेक गंभीर अपघात घडतात. यात दोष नसलेल्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. एखाद्या मद्यपी चालकाच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविणे थांबवलेच पाहिजे.’

दरम्यान, अशा स्वरूपाची समुपदेशन शिबिरे आता दर आठवड्याला आयोजित केली जाणार आहेत, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.आणखी वाचा