• Sat. Mar 7th, 2026

    नागपुरात भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे

    ByMH LIVE NEWS

    Feb 1, 2026
    नागपुरात भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे

    नागपूर 

    नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत नुकत्याच निवडून आलेल्या १०२ नगरसेवकांचे भारतीय जनता पक्षाने राजीनामे शनिवारी घेतले. नगरसेवकांच्या पहिल्याच बैठकीत पक्षाने राजीनामा पत्रावर स्वाक्षरी घेतल्याने अनेक नवे नगरसेवक गोंधळले होते. मात्र, ही पक्षाची प्रथा आहे, हे समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले असल्याने आणि नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याने भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पुढे ढकलली जात होती. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री नागपुरात आले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांना गटनेता म्हणून निवडण्यात आले. त्यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यालयास मुंबई येथे पाठविण्यात आला. त्याला मान्यता मिळाल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी रजवाडा पॅलेस येथे भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक बोलावली. त्या बैठकीत गटनेते म्हणून बोरकर यांच्या नावाची घोषणा केली.

    राष्ट्रवादी जे ठरवेल त्याला भाजपचा पाठिंबा, उपमुख्यमंत्री पदाबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण

    याच बैठकीत भाजपने सगळ्या नगरसेवकांना एक कागद देऊन त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. तो कागद बघून नव्या नगरसेवक काहीसे धास्तावले. ‘निवडून येऊन महिनाही झाला नाही. अजून महापालिकेचे तोंड बघितले नाही आणि पक्ष राजीनामा मागतो, याचा मला धक्का बसला. ही पक्षाची पद्धत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर माझ्या मनाचे समाधान झाले,’ अशी प्रतिक्रिया एका नवोदित नगरसेविकेने व्यक्त केली. इतर नव्या नगरसेवकांचीही तशी स्थिती हेाती. ज्येष्ठ नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांचे समाधान झाले आणि त्यांनी राजीनामापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या.
    ‘पक्षाची अनुशासनात्मक आचारसंहिता म्हणून आम्ही नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेतो. नगरसेवक बनल्यानंतर कुणी असामाजिक कामात गुंतल्याचे आढळले, कुणी सामाजिक द्वेष पसरविण्याच्या घटनांत सहभागी असल्याचे आढळले, कुणी आर्थिक घोटाळ्यात सापडले तर पक्षाची प्रतिमा स्वच्छ राहावी, म्हणून नगरसेवकांचे राजीनामे घेतो. ही आजची प्रथा नाही, आम्ही १९९७पासून तसे करतो. देवेंद्र फडणवीस नगरसेवक असताना त्यांनाही याच प्रक्रियेतून जावे लागले होते,’ असे भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले.

    तिघांना काढले होते पक्षाबाहेर
    दयाशंकर तिवारी यांनी दिलेल्या महितीनुसार, भाजप १९९२पासून निवडून येताच नगरसेवकांचे राजीनामे घेतो. त्याचा वापर करण्याची वेळ मात्र भाजपवर केवळ एकदाच आली. १९९२ ते १९९७ या काळात तीन नगरसेवकांना अशा प्रकारे राजीनाम्याचा वापर करीत पक्षातून काढून टाकण्यात आले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed