महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी महिला पायलट्सच्या कौशल्याचे कौतुक करणारी एक पोस्ट केली होती.
प्रशासकीय, सरकारी आणि वैयक्तिक कामांसाठी अजित पवारांनी अनेकदा विमान प्रवास केला. आपल्या याच विमान प्रवासाच्या अनुभवाच्या आधारावर अजित पवार यांनी २ वर्षांपूर्वी एक्सवर एक पोस्ट केली होती. ‘जेव्हा तो अतिशय आरामात लँड करता, तेव्हा त्याचा अर्थ पायलट कोणीतरी महिला असेल,’ असं अजित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.
अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. त्या विमानाचं सारथ्य कॅप्टन शांभवी पाठक आणि सुमित कपूर यांच्याकडे होतं. अजित पवारांनी दोन वर्षांपूर्वी केलेली पोस्ट पाहता त्यांचा महिला पायलट्सच्या कौशल्यावर खूप विश्वास होता. अजित पवारांनी १८ जानेवारी २०२४ रोजी याबद्दल पोस्ट केली होती. या पोस्टमधून त्यांनी महिला पायलट्सच्या कौशल्याचं कौतुक केलं होतं.
‘जेव्हा आपण हेलिकॉप्टर किंवा विमानानं प्रवास करतो आणि आपलं प्लेन किंवा हेलिकॉप्टर आरामात लँड करतं, तेव्हा आपण समजून जातं की पायलट एक महिला आहे,’ अशी पोस्ट अजित पवारांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. अजित पवारांची ही पोस्ट आज चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टखाली अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अजित पवार Learjet 45 नं बारामतीला जात होते. सकाळी सव्वा आठच्या सुमारास या विमानानं मुंबई सोडली. बारामतीत लँडिंग करताना विमानाला भीषण अपघात झाला. त्या अपघातात विमानातील सगळ्यांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एक दिलखुलास व्यक्तीमत्त्व हरपल्याची भावना अनेक जण व्यक्त करत आहेत.
