राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. बुधवारी सकाळी नेमकं काय घडलं? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?
“बारामती विमानतळावरुन आज सकाळी सुमारे पावणे नऊ वाजेच्या सुमारास एक फोन आला. एक विमान कोसळलं आहे आणि स्फोट झाला आहे, त्या विमानात अजित दादा आहेत, असं आम्हाला सांगण्यात आलं. दोन मिनिटे आम्हाला काही सजलंच नाही की, नेमकं काय झालं? कारण सकाळी धुकं होतं. असंही सांगितलं गेलं की, विमानाने विमानतळाच्या वरुन दोनवेळा घिरट्या मारल्यानंतर तिसऱ्यांदा लँडिंगची परवानगी मिळाली. त्यांना लँडिंगची परवानगी तेव्हा मिळाली जेव्हा पायलटने सांगितलं की, मला आता धावपट्टी दिसायला लागली. त्यानंतर जे काही झालं ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
‘तिसऱ्यांदा लँडिंगवेळी अपघात’
“बारामतीत येताना मी सुद्धा त्या स्थळाची पाहणी केली. धावपट्टीच्या तीनही बाजूला शंभर-शंभर मीटरवर खड्ड्यासारखं आहे. म्हणजे उंचावर ती धावपट्टी आहे. या घटनेचं प्रशासन पूर्ण तपास करतील. त्यातून घटना कशामुळे घडली ते माहिती पडेल. पण हे नक्की आहे की, सकाळी धुकं होतं. विमानाने दोनवेळा प्रयत्न केले, पण तिसऱ्यांदा लँडिंगवेळी अपघात घडला”, अशी महत्त्वाची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
“ही फार दुखद घडला आहे. आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही दिल्लीत होतो. खासदार सुनेत्रा पवार वहिणी, पार्थ पवार, खासदार सुप्रिया ताई दिल्लीत होत्या. कारण आज आमच्या संसदेचं अधिवेशन सुरु होत होतं. आम्हाला घटनेची माहिती मिळाली तसं आम्ही बारामतीला आलो. राज्याची अतिशय मोठी हानी झाली आहे”, अशी भावना प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
‘रात्री अजित दादा म्हणाले, प्रफुल्ल आता भेट होणार नाही’
“आम्हाला विश्वास होत नाही. आम्ही त्यांच्या पार्थिवला नमन करुन आलो, पण अजूनही विश्वास बसत नाही. कारण काल रात्रीच आठ-साडेआठच्या सुमारास त्यांनी मला फोन केला. आमचं फोनवर बोलणं झालं. ते शेवटी एवढंच म्हणाले की, प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही कारण मी आठ-दहा दिवस बाहेर आहे. भेट होणार नाही असं म्हणाले आणि आज खरंच तसं घडलं आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
“दु:खाची गोष्ट आहे की, या घटनेत काही लोकांनी राजकारण आणलं आहे. पण या घटनेत कुठेही राजकारण नाही. जे काही झालं त्याची माहिती चौकशीत समोर येईल. अशावेळी राजकारण करु नये. मला याचं खूप दु:ख आहे”, अशी खंत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
