बीड
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना विधानसभा सभागृहात दिलेल्या शब्दाची पूर्तता केली. बीड जिल्ह्याच्या परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत मेगा सोलर प्रकल्प उभारण्यास शासनाने नुकतीच मंजुरी दिली. या अनुषंगाणे पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला सोलर प्रकल्प उभारण्यात येत असून त्याची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केली आहे.
या सोलार निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीमुळे वीज निर्मितीसह परळी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार असून हा प्रकल्प परळीच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या संचाची उभारणी करण्यात येणार असून याबाबतची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त परळीकरांच्या वतीने आभार मानले आहेत.