चंद्रपुरात काँग्रेसमध्ये मोठी अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.
“चंद्रपूरमध्ये काँग्रेस जवळपास बहुमताच्या जवळ आहे. आम्ही सत्तेच्या अगदी जवळ पोहोचलो. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आम्ही सर्वजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने आमचे काही नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले. खरंतर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेवून असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती. ही चुकीची पद्धत झाली. काँग्रेसचे विभाजन दोन गटात झाले. विजय वडेट्टीवार यांचे काही लोकं नगरसेवकांच्या घरी गेले. ते रॅलीत असताना त्या रॅलीतूनच त्यांना उचलून घेऊन गेले”, असा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.
“सोयीसाठी न्यायचे होते तर सर्वांनाच घेऊन जायला हवं होतं. तुम्ही दिलेल्या एबी फॉर्मवर नगरसेवक निवडून आले. अर्धे तुमचे आणि अर्धे आमचे असा विषय आला नाही. खरंतर हा मतदारसंघ माझा आहे. मी इथे काँग्रेसची खासदार म्हणून काम करत आहे. असं असताना कुणीही बाहेरचा माणूस येईल आणि अशाप्रकारचं काम करेल हे पक्षासाठी चुकीचं आहे”, अशी नाराजी धानोरकर यांनी व्यक्त केली.
Chhatrapati Sambhajinagar : मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला घेराव, भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक
“विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आहेत. मी देखील काँग्रेसची आहे. ते संपूर्ण राज्याचे नेते आहेत. ते माझ्या लोकसभा मतदारसंघापुरता मर्यादीत नाहीत. त्यामुळे त्यांना विनंती आहे की, आख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त माझ्या मतदारसंघापुरता किंवा कोणत्या जिल्ह्यापुरता मर्यादीत राहू नये. मी स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे. मी कधी कुणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय ठेवत नाही. माझा मतदारसंघ आहे. मी सर्वांना एबी फॉर्म दिले, जवळपास महिनाभर मेहनत घेतली आणि सर्वांना निवडून आणलं. यानंतर वेळेवर येऊन कुणी असं कृत्य करत असेल तर ते पक्षासाठी देखील हानिकारक आहे”, असं प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
BMC Mayor : मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीत खल, सर्वोच्च पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
“2019 पासून माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ होत आहे. माझ्या पतीच्या निवडणुकीवेळी देखील ढवळाढवळ झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीला मी निवडणूक लढवली. लोकसभेच्या तिकीटावेळी देखील हाच प्रकार झाला. आतादेखील तेच होत आहे. मी कुणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. पक्ष वाढवण्यासाठी मी काम करत आहे. चंद्रपूरचे 2012 मध्ये 12 नगरसेवक होते. आता मी 30 नगरसेवक निवडून आणले. अशावेळी वेळेवर येऊन हे माझे आणि ते माझे करणे योग्य नाही”, अशी टीका प्रतिभा धानोरकर यांनी केली.
