नागपूर महापालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 78 उमेदवार रिंगणात असूनही एकही जागा जिंकता आली नाही. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी राजीनामा दिला आहे. अंतर्गत गटबाजी, आघाडीतील तणाव आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे दिसून येते.
या निकालातून नागपूर शहरातील बदलती राजकीय मानसिकता आणि पक्षीय समीकरणांतील अस्थिरता स्पष्टपणे समोर आली आहे. दुनेश्वर पेठे स्वतः उमेदवार असतानाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांनी त्यांचा पराभव करत निर्णायक विजय मिळवला. विशेष म्हणजे भाजप उमेदवाराने स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, पारदर्शक कारभार आणि युवकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत प्रचार केला होता. या मुद्द्यांवर मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे निकालातून दिसून आले.
शरद पवरांच्या राष्ट्रवादीकडून मात्र पाच ते सात जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला जात होता. माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्यासह अनेक अनुभवी नेते मैदानात होते. निवडणुकीच्या मध्यावर शिवसेना उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात काही प्रभागांत परस्पर समर्थनाचा निर्णय झाला होता. मात्र ही रणनीती प्रत्यक्ष मतदानात परिणामकारक ठरली नाही. युतीचा लाभ मिळण्याऐवजी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याची चर्चा आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, या पराभवामागे केवळ निवडणूक गणित नव्हे तर पक्षातील अंतर्गत विसंवाद, स्थानिक नेतृत्वाबाबत असमाधान आणि महाविकास आघाडीतील तणाव कारणीभूत ठरले. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक असलेले दुनेश्वर पेठे यावेळीही पक्षाचा चेहरा होते. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दावा असलेली जागा राष्ट्रवादीने घेतल्याने निर्माण झालेली नाराजी पूर्णपणे मिटली नव्हती. त्याचा परिणाम याही वेळी झाला, अशी चर्चा आहे.
Thane News : ठाण्याचा ‘ढाण्या’ वाघ ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंनी दिली पाठीवर थाप, आता थांबायचं नाही!
काँग्रेससोबत आघाडी टिकवण्यासाठी प्रयत्न झाले होते. काँग्रेसकडून ११ जागांची ऑफरही देण्यात आली होती. मात्र अंतिम टप्प्यात आघाडी तुटली आणि राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राजकीयदृष्ट्या तोट्याचा ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादीसमोर संघटन मजबूत करणे, स्थानिक प्रश्नांशी थेट जोड निर्माण करणे आणि आघाडीच्या राजकारणाचा नव्याने विचार करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
