• Mon. Mar 9th, 2026

    काळी बाहुली, लिंबू अन् टाचण्या; ठाकरेंच्या शिलेदारावर भानामतीचा प्रकार; मतदानाच्या तोंडावर खळबळ

    काळी बाहुली, लिंबू अन् टाचण्या; ठाकरेंच्या शिलेदारावर भानामतीचा प्रकार; मतदानाच्या तोंडावर खळबळ

    कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर दुर्गमानवाड येथे भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    – साईप्रसाद महेंद्रकर

    कोल्हापूर: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी पूर्ण होऊन सर्वांचे लक्ष मतदानाकडे लागले आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे भानामती केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या ठीक आदल्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र खळबळ उडाली आहे.

    गेल्या तीन-चार वर्षांपासून रविकिरण इंगवले शहरातील विविध स्थानिक समस्या, सामाजिक प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यांवरून आंदोलने करत आहेत. महापालिका निवडणुकांच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी, भ्रष्टाचार आणि नातेवाईकांना उमेदवारी देण्याचे गंभीर आरोप त्यांनी केले. बलभीम बँक घोटाळा, आमदार पुत्राची उमेदवारी यासह विविध मुद्द्यांवरुन त्यांनी प्रचारसभांमधून जोरदार हल्ला चढवला होता.
    Maharashtra Timesजिथे भाजप-MIMची युती, तिथेच शिंदेसेनेचा मोठा डाव; ‘धुरंदर’ नेत्याला मदतीसाठी साद, निकाल फिरणार?
    या काळात इंगवले यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभागांतील रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेजसारख्या समस्या उपस्थित करून नागरिकांमध्ये पक्षाची पकड मजबूत केली. पक्षाच्या वचननामा प्रकाशन सोहळ्यातही त्यांनी उपस्थिती लावून विकासाभिमुख भूमिका मांडली. महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध त्यांचे आरोप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाले होते.

    दुर्गमानवाड येथे भानामतीचा प्रकार
    सोमवारी मध्यरात्री राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड देवस्थान मंदिराजवळील झाडावर इंगवले यांचा फोटो खिळे ठोकून भानामती करण्यात आली होती. काळी बाहुली, लिंबू, टाचण्या यांसारखे साहित्य वापरल्याची माहिती समोर आली असून, हा प्रकार आज सकाळी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आढळला. त्यांनी तात्काळ इंगवले यांना कळवले. मतदानाच्या एका दिवस आधी असा प्रकार घडल्याने दुर्गमानवाड आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी घटनास्थळी जमा होऊन निषेध व्यक्त केला.
    Maharashtra Timesबदलापूर भाजपची पाठ सोडेना; शिंदेंच्या होमपीचवर पुन्हा गोची; स्वपक्षीयांमुळे ‘स्वीकृत’ अडचण
    कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आघाडीने वचननामा जारी करून विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे. इंगवले यांच्या आक्रमकतेमुळे महायुतीमध्ये अस्वस्थता असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. त्यातच हा प्रकार निवडणुकीच्या वातावरणात तणाव वाढवणारा ठरला आहे. दरम्यान परिसरातील ग्रामस्थांनी अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उठवला असून, पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. राजकीय वर्तुळात याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा