राज्यभरात प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या आहेत. दरम्यान, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठीबहुल ठाण्यात भोजपुरी कलाकारांकडूनही प्रचार करण्यात आला.
या प्रभागात उबाठाचे उर्मिला माने, सिता सोडारी, प्रतिक राणे आणि मनसेतून पवन पडवळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील या प्रभागामध्ये भोजपुरी अभिनेते दिनेश लाल यादव (निरहुवा) आणि भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी युतीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीला हजेरी लावली. तसेच उत्तर भारतीय मतदारांना या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन या रॅलीत करण्यात आले.
या रॅलीनंतर या कलाकारांनी इंदिरानगर चौकात आयोजित जाहीर सभेला हजेरी लावली. यावेळी भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, कृपाशंकर सिंह, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते.
Pune News : आताच्या घडीची मोठी बातमी! अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या कार्यालयात पोलीस पोहोचले
प्रचाराच्या तोफा थंडावल्या
दरम्यान, आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी… प्रचाराची रणधुमाळी… उमेदवारांची धावपळ, असा एक महिन्यांपासून सुरू असलेला सिलसिला मंगळवारी पाच वाजता थंडावला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रभागातील अखेरच्या मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धावपळ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळपासून सुरु होती. उन्हातान्हात सर्वपक्षीय नेत्यांचे रोड शो, कार्यकर्त्यांच्या बाईक रॅली आणि मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीत उमेदवारांनी जीवाचे रान केले. त्यामुळे मतदारराजा गुरुवारी कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘या’ नेत्यांनी गाजवला प्रचार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) नेत्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांची प्रचाराला हजेरी, अशा वातावरणात निवडणुकीची रणधुमाळी पार पडली.
Pune News : ‘कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे’, राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर फडणवीसांचा मिश्किल टोला
अखेरच्या दिवशी राणे – सरनाईक ‘रोड शो’
प्रचाराच्या अखेरीस मंत्री नितेश राणे यांचा शहरात रोड शो झाला. तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनीही रोड शोद्वारे मतदारांना युतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले.
