Mumbai Infra Projects: मुंबईतील वाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तीन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. मेट्रो, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचे काम अंतिम टप्प्यात असून ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचं खोदकाम सुरू होणार आहे.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महामुंबईतील नागरिकांचा मेट्रो आणि रस्ते प्रवास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून काही अंशी दिलासादायक होण्याची चिन्हे आहेत. डी. एन. नगर ते मंडाळे ही मेट्रो २ बी मार्गिका चेंबूरपर्यंत खुली होणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाला वांद्रे-कुर्ला संकुलाशी जोडणाऱ्या सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड अर्थात ‘एससीएलआर’ अंतिम टप्प्यातील वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. ठाणे-बोरिवलीदरम्यान प्रवास काही मिनिटांवर आणणाऱ्या दुहेरी बोगदा प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामाचा प्रारंभ अर्जुन टीबीएमच्या मदतीने होणार आहे. या सर्व कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
मेट्रो मार्गिका २बी
‘मेट्रो २ बी’चा डायमंड गार्डन ते मानखुर्द हा पहिला टप्पा ८ एप्रिलपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. डायमंड गार्डन ते चेंबूर मेट्रो स्थानक असा दुसरा टप्पा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात खुला होण्याची शक्यता आहे. चेंबूर मेट्रो स्थानक हे व्ही. एन. पुरव मार्गावरील मोनोरेल स्थानकापासून १०० मीटर अंतरावर आहे. चेंबूर मोनोरेल स्थानकापासून चेंबूर रेल्वे स्थानक सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. यामुळे चेंबूरपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोनो, मेट्रो आणि हार्बर लोकल असे तिन्ही वाहतुकीचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. चेंबूरसह पूर्व उपनगरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Harbour Local : CSMT-गोरेगाव हार्बर लोकल दीड महिने बंद राहण्याचे संकेत, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम, वांद्य्रात नवा फलाट
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडचा विस्तार
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या १.४ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात ५०० मीटर लांबीचा चारपदरी उन्नत मार्ग, तसेच ९०० मीटर लांबीचे दोनपदरी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे उड्डाणपूल मार्ग आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाली असून सध्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला जंक्शनपासून थेट भारतनगर, वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत पोहोचण्यासाठी हा अंतिम टप्पा महत्त्वाचा आहे. हा मार्ग खुला झाल्यावर कलानगरमार्गे घालावा लागणारा वळसा टळणार असून वाकोला परिसरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
Goregaon-Mulund Link Road: तलाव, टेकड्या, उद्यानाखालून जुळे बोगदे, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी ‘टीबीएम’ तयार; महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होणार
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा
ठाणे-बोरिवली दुहेरा बोगदा प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे काम नायक टीबीएमच्या मदतीने सुरू आहे. दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम अर्जुन टीबीएमच्या मदतीने करण्यात येणार आहे. सुमारे १२ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पात १० किलोमीटरचे दुहेरी बोगदे आणि जवळपास दोन किलोमीटर लांबीचे जोडरस्ते असतील. सध्या ठाणे ते बोरिवली प्रवासास सुमारे दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ १५ मिनिटांवर येण्याची आशा आहे. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदे ११.८४ किमी लांब असतील. यापैकी ५.७५ किमी मार्ग बोरिवलीच्या बाजूने असेल आणि उरलेले ६.०९ किमी मार्ग ठाण्याच्या बाजूने असेल. १.५९ कनेक्टर रोड असेल. आहे. या प्रकल्पाला एसबीडब्ल्यूएल, एनबीडब्ल्यूएल, वन प्राधिकरण, एफआरए आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र प्राधिकरणांकडून मंजुरी मिळाली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा