मुंबई महापालिका निवडणुकीत चेंबूरच्या प्रभाग १७३ मध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. भाजपने एबी फॉर्म परत घेतल्यानंतरही शिल्पा केळुसकर यांनी झेरॉक्सवर अर्ज भरल्याने हा सामना रंगला आहे. कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके’ आणि ‘एबी फॉर्म चोर’ अशा घोषणांनी वातावरण तापवले.
प्रभाग क्रमांक १७३ जागावाटपात शिंदेसेनेच्या वाट्याला गेला. इथून शिंदेसेनेनं पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली. भाजपनं शिल्पा केळुसकर यांना एबी फॉर्म दिला होता. पण नंतर तो त्यांच्याकडून परत घेतला. पण केळुसकर यांनी या फॉर्मची कलर झेरॉक्स काढून घेतली होती. त्याच्याच आधारे केळुसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पक्षानं त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. केळुसकर यांची उमेदवारी निवडणूक आयोगानं केलेल्या छाननीनंतरही कायम राहिली. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक १७३ मध्ये शिंदेसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे.
भाजप पाठोपाठ शिंदेसेनेची MIM सोबत युती; ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणणारे शिंदे आता म्हणतात…
शिंदेसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकर यांचा प्रचार सध्या सुरु आहे. आज त्यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. त्यावेळी शिल्पा केळुसकर यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण एकदम तापलं. शिंदेंनी बंड केल्यावर विरोधकांनी दिलेली घोषणा आता भाजपच्याच कार्यकर्त्यांनी दिल्यानं विषय गंभीर झाला.
यावेळी भाजप उमेदवार शिल्पा केळुसकर यांचे पती दत्ता केळुसकर तिथेच होते. त्यांनी पन्नास खोकेच्या घोषणेत थोडी सुधारणा केली. ‘पूजा कांबळे यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यात ११ कोटींची मालमत्ता दाखवली. त्यांच्या संपत्तीचा आकडा पाहून माझे डोळे पांढरे झाले. हे ११ कोटी रुपये नेमके आले कुठून? त्यांची मालमत्ता पाहून आम्ही पन्नास खोकेची घोषणा बदलली आणि अकरा खोके एकदम ओके म्हटलं. ही घोषणा त्यांच्या पक्षासाठी नाही. ही घोषणा आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारासाठीच आहे. ती वैयक्तिक स्वरुपाची आहे,’ असं दत्ता केळुसकर म्हणाले.
काँग्रेस-भाजपची युती झालेल्या अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट; शिंदेंचा चव्हाणांना शह, भाजप चेकमेट
भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीला शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिल्पा केळुसकर यांनी पक्षाच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढून अर्ज भरला. त्यांच्या विरोधात भाजपनं तक्रार दाखल केली होती. तो धागा पकडत, गली गली में शोर है, एबी फॉर्म चोर है, अशा घोषणा शिंदेसेनेकडून देण्यात आल्या.
