• Sun. Mar 15th, 2026

    गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार वाढीस चालना मिळणार : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 1, 2026
    गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार वाढीस चालना मिळणार : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा – महासंवाद

    गडचिरोली, दि. १ : बदलत्या औद्योगिक व कृषी अर्थव्यवस्थेत युवकांना तात्काळ रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पमुदतीचे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. गडचिरोली येथील क्रातीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले, त्या कार्यक्रमात ते दूरदृश्य प्रणाली द्वारे बोलत होते.

    हा नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीच्या कौशल्य विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन लुईस आदी मान्यवर उपस्थित होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील रोजगारनिर्मितीस गती मिळत असून, येत्या पाच वर्षांत हा जिल्हा राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक ठरेल, असा विश्वासही मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक युवकांना विकासप्रक्रियेचा थेट लाभ मिळावा, यासाठी कौशल्यविकास विभाग वेगाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

    मंत्री लोढा पुढे म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात युवकांना दीर्घकालीन शिक्षणाबरोबरच तात्काळ रोजगार देणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत. ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’सारखे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम युवकांना थेट उद्योगाशी जोडतात. लोहखनिज व इतर औद्योगिक गुंतवणुकीमुळे गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहत असून, त्या पार्श्वभूमीवर कुशल मनुष्यबळ तयार करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. येथे सुरू असलेल्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना गती देताना स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. सामान्य नागरिकाला शासनाच्या सर्व सेवा व सुविधा सहज आणि सुलभपणे मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलपणे काम करावे, असे त्यांनी नमूद केले. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला जिल्ह्याला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    स्थानिक युवकांसाठी कौशल्यवृद्धीवर भर : जिल्हाधिकारी

    जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले की, गडचिरोलीत येणाऱ्या गुंतवणुकीचा जास्तीत जास्त लाभ स्थानिक युवकांना मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. युवकांची कॅपॅसिटी बिल्डिंग वाढविण्यावर भर देण्यात येत असून, विविध माध्यमांतून रोजगाराभिमुख प्रशिक्षण व कौशल्यविकास अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. आयटीआय–उद्योग सहकार्याच्या माध्यमातून युवकांना थेट रोजगाराशी जोडण्याचा हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

    औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी प्रास्ताविकात माहिती देताना सांगितले की, हा अभ्यासक्रम ८ ऑक्टोबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला. एकूण ३९० तासांचे, दररोज सहा तासांचे सघन प्रशिक्षण देण्यात आले. ट्रॅक्टर दुरुस्ती, देखभाल व आधुनिक तांत्रिक प्रणालींचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले. यात ३० प्रशिक्षणार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.

    कार्यक्रमात उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी मयूर बुरले व संयोग कोहळे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
    जिल्हा प्रशासनाने प्रशिक्षणार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली, तर आयटीआय गडचिरोलीने निवासाची सोय उपलब्ध करून दिली. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने प्रशिक्षणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून दिले.

    उपस्थितांचे आभार कौशल्य विकास चे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी व्यक्त केले.
    याप्रसंगी कौशल्य विकास विभाग, शासकीय औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed