Pune Election News: गुन्हेगारी टोळ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देत असल्याची टीका राष्ट्रवादीवर सर्वच स्तरातून होत आहे. या आरोपांवर उत्तर देत अखेर अजित पवारांनी आपली बाजू मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेत कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या कुटुंबातील दोन सदस्यांना आणि गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे. एकीकडे पोलीस प्रशासनाला गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आदेश देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री, दुसरीकडे मात्र गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींना राजकीय प्रतिष्ठा देत असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. या गंभीर आरोपांवर अखेर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली.
अजित पवार म्हणाले की, “निवडणुकीत आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (RPI) सचिन खरात गटासोबत युती झाली आहे. युतीच्या जागावाटपानुसार आम्ही काही जागा मित्रपक्षासाठी सोडल्या होत्या. ज्या जागा मित्रपक्षाला दिल्या जातात, तिथे उमेदवार निवडण्याचा पूर्ण अधिकार संबंधित पक्षाचा असतो. तिथे आमचा हस्तक्षेप नसतो.” उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरू असलेला गोंधळ आणि ‘एबी’ फॉर्म वाटपातील अनिश्चितता यामुळे हा पेच निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
थोडक्यात, या गुन्हेगारी कुटुंबांना दिलेल्या उमेदवारी राष्ट्रवादीच्या चिन्हावर असल्या तरी त्या सचिन खरात यांच्या पक्षाच्या कोट्यातून देण्यात आल्याचे स्पष्टीकरण पवारांनी दिले आहे. मात्र, या प्रकरणावर सचिन खरात यांनी तूर्तास मौन पाळले असून, अजित पवारांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता या वादाचे खापर नक्की कोणावर फुटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
