Mumbai BEST Bus Accident: मुंबईत 2024 च्या डिसेंबरमध्ये कुर्ल्यात एका सोमवारी बेस्ट बस चालकाने 9 जणांना चिरडले होते. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा सोमवार मुंबईकरांसाठी काळ ठरला आहे. काल रात्री भांडूपमध्ये बेस्ट बसने 14 जणांना चिरडले असून, त्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
भांडूप रेल्वे स्थानकाजवळ रात्री सुमारे 10 वाजता हा अपघात घडला. बस क्रमांक 606 (नरदास नगरकडे जाणारी) यू-टर्न घेत असताना चालकाने ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबल्याने बस वेगात पुढे गेली. नियंत्रण सुटलेली बस थेट फूटपाथवर चढली आणि पादचाऱ्यांना चिरडत पुढे सरकली. क्षणातच परिसरात आरडाओरड आणि भीतीचे वातावरण पसरले.
Bhandup BEST Bus Accident: थरारक! ब्रेकऐवजी चुकून ॲक्सिलेटर दाबला अन् क्षणात होत्याचं नव्हतं; भांडुप बेस्ट बस अपघातात चौघांचा मृत्यू, 10 जखमी
अपघातात सामील असलेली बस विक्रोळी डेपोशी संलग्न असलेली वेट-लीजवरील इलेक्ट्रिक एसी बस होती. बसचा चालक संतोष रमेश सावंत (52) याला कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्यात आले होते. भांडूप पोलिसांनी सावंत यांना ताब्यात घेतले असून, निष्काळजीपणा व बेदरकार वाहनचालना मुळे मृत्यू घडवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाने तातडीने चालकाला निलंबित केले असून, संपूर्ण प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “बस चालकाला आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले होते की नाही, याची सखोल चौकशी केली जाईल,” असे बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या बसवरील कंडक्टर भगवान घरे (46) असल्याची माहिती आहे.
मृतांची नावे समोर
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चौघांपैकी तीन महिला आहेत. मृतांमध्ये सायन रुग्णालयातील नर्स मानसी गुरव (45), छोटी अभिनेत्री प्रणिता रसम (31), वर्षा सावंत (25) आणि वाहतूक विभागात कार्यरत प्रशांत शिंदे यांचा समावेश आहे. मानसी गुरव यांच्या पतीने सांगितले की, त्या रोज ट्रेनने भांडूपला उतरून बसने घरी परतत असत. दररोजचा तोच प्रवास सोमवारी त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला. अभिनेत्री प्रणिता रसम हिचा पती संदीप याने सांगितले की, ती दादरमध्ये शूटिंगसाठी गेली असल्याचीच माहिती त्याला शेवटपर्यंत होती. मात्र घरी परतण्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली. अपघातावेळी प्रणितासोबत असलेली तिची नऊ वर्षांची मुलगीही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
Mumbai News: थर्टी फर्स्टसाठी गेट वे, चौपाटीवर जाण्याची प्लॅनिंग करताय? BESTची नवी सेवा नक्की पाहा, ‘या’ मार्गांवर विशेष बसेस
काय घडलं होतं कुर्ल्यात?
एका वर्षापूर्वी कुर्ल्यामध्ये BEST बस चालकाचे नियंत्रण सुटून 22 गाड्यांना ठोकले होते. हा अपघात 9 डिसेंबरला झाला असून तोसुद्धा एक सोमवारच होता. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 42 जणं जखमी झाले होते.
