उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवू, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा केली. “चिंचवडमध्ये राष्ट्रवादी पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी एकत्र लढत आहेत. हा परिवार पुन्हा एकत्र येत आहे. दोन्ही पक्षाने एकत्र यावे हे बऱ्याच जणांच्या मनात होतं. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत. पुढे मागे करून जागावाटप केले आहे. येणाऱ्या दोन दिवसात तुम्हाला कळेल”, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात पक्षांतर, भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेवरून भाजपवर निशाणादेखील साधला.
अजित पवारांचा भाजवर निशाणा
“माझ्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. ज्याला पक्षात यायचं असेल तो स्वखुशीनं यायचा. मात्र सध्या दमबाजी, दबाव आणि धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हे नेमकं काय चाललं आहे?” असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेली महानगर पालिका आज कर्जबाजारी झाली आहे. हे दुर्दैवी आहे”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार आणखी काय-काय म्हणाले?
- “1992 ते 2017 या काळात महानगरपालिका चालवताना कधीही कर्ज काढावं लागलं नाही. त्या काळात मी सांगितलेले महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक नागरिकांनी निवडून दिले. माझ्यावर त्या काळात पाच पैशांचाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.”
- “महानगरपालिका निवडणुका उशिरा झाल्याबद्दलही अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. “2017 नंतर 2022 मध्ये निवडणूक व्हायला हवी होती. कोरोना आणि इतर कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या.”
- “पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचा दरारा राहिलेला नाही. काही व्यक्तींना थेट बोलावून दम दिला जात आहे. काहींची बांधकामं थांबवली जात आहेत. हे असले धंदे पिंपरी-चिंचवडकरांनी खपवून घेऊ नयेत.”
- “मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. कुणाच्याही दबावाला घाबरू नका. विचार करून मतदान करा.”
- “आम्ही कधी जातीवाद किंवा जातीभेद केला नाही. आपलं रक्त लाल आहे. 2029 मध्ये पाच आमदार निवडून येतील आणि 288 आमदारांबरोबर 96 महिला आमदार विधानसभेत असतील.”
- “अलीकडील निवडणुकांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. हे सर्वांना माहीत आहे की राष्ट्रवादीच काम करू शकते.”
