महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शालिनीताई पाटील यांचे निधन झाले. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. शरद पवारांनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाच्या आठवणींना उजाळा दिला.
त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावूक ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने “शरदचं नेतृत्व मान्य करा,” हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत,’ अशा शब्दांत पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील शालिनीताईंचे महत्त्व आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील यांनी आज मुंबईतल्या माहिमध्ये असलेल्या त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या 94 वर्षांच्या होत्या, गेले काही दिवस त्या आजारी होत्या अशी माहिती मिळते आहे. आता मात्र वृद्धापकाळाने आज त्यांची प्राणज्योत माळवली आहे. याबद्दलची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही पोस्ट करुन दिली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय जगतात शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांना श्रंद्धांजली वाहिली आहे.
‘पिंपरीचा दादा’ विरुद्ध ‘बारामतीचा दादा’! महेश लांडगेंनी राष्ट्रवादीचं घर फोडलं; संजोग वाघेरेंपासून शितोळेंपर्यंत बड्या नेत्यांची भाजपात उडी
दरम्यान, वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील आणि शरद पवार यांच्यातील संबंध हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या नात्यांमध्ये आदर, राजकीय बंडखोरी, तीव्र विरोध अन् पुन्हा जवळीक अशी अनेक वळणं पाहायला मिळालेली आहेत.
शरद पवारांवर टीका
शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. मात्र, १९७८ मध्ये शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ‘पुलोद’ प्रयोग खूप गाजला होता. या घटनेला शालिनीताईंनी शरद पवारांनी “वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला” असे म्हणत शरद पवारांवर टीका केली होती. तेव्हापासून वसंतदादा आणि शरद पवार यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली होती.
पवारांशी मतभेद
शालिनीताई पाटील या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होत्या. वसंतदादांच्या निधनानंतरही त्यांनी पवारांच्या विरोधातील आपली भूमिका कायम ठेवली होती. विशेषतः ‘आर्थिक निकषावर आरक्षण’ या मुद्द्यावरून त्यांचे पवारांशी तीव्र मतभेद झाले होते.
