• Tue. Mar 10th, 2026
    Municipal Election : मोठा राजकीय गेम! काँग्रेस आणि ‘वंचित’ची आघाडी होण्याची दाट शक्यता, पडद्यामागे हालचाली

    महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी बघायला मिळणार आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आगामी काळात एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. कारण पडद्यामागे तशा घडामोडी घडल्याची माहिती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई वगळता इतर सर्व 28 महापालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महायुतीसाठी महापालिका निवडणुकीत नवं चॅलेंज उभं राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत येऊन भेट घेतली. या भेटीत एकत्र महापालिका निवडणुका लढण्याबाबत निर्णय झाला. काँग्रेसचा वंचितसोबत जागावाटपाचा लवकरच फॉर्म्युला ठरणार आहे. विशेष म्हणजे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत. तर दुसरीकडे वंचित आणि काँग्रेस एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत.

    महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षात अतिशय वेगवान घडामोडी सुरु आहेत. बैठका घेतल्या जात आहेत. उमेदवारांना अर्जांचं वाटप केलं जात आहे. काही ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. या निवडणुकीत कुणासोबत युती आणि आघाडी करायची? याबाबतही नेतेमंडळींची चर्चा सुरु आहे. अशीच चर्चा काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात झाली. या बैठकीत आघाडीचा निर्णय झाल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे.

    काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र यावेत यासाठी अनेक नेत्यांकडून पडद्यामागे प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे. अखेर या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. मुंबईत दोन्ही पक्ष एकत्र लढणार नसले तरी उर्वरित ठिकाणी दोन्ही पक्षांची आघाडी होणार असल्याची माहिती आहे. यासाठी जागावाटपाची पहिल्या टप्प्यातील बैठक काल पार पडली आहे. आगामी काळात याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. विरोधकांमधला हा महत्त्वाचा पक्ष आहे. पण राज्यात वंचित बहुजन आघाडीची देखील ताकद आहे. तळागळापर्यंत हा पक्ष पोहोचलेला आहे. मतांचं विभाजन झालं नाही तर हा पक्ष देखील मोठी मजल मारु शकतो. याआधी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते आपल्याला बघायला मिळालं होतं. वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली तर काही ठिकाणी महायुतीसाठी मोठं चॅलेंज असणार आहे. त्याठिकाणी महायुती कदाचित केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पक्षाला ताकद देऊ शकते. त्यामुळे तिथे कशी लढत होते? ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा