Baramati Murder Case: बारामती शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन मित्रांनी आपापसातील वादातून तिसऱ्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आलेल्या अविनाश धनंजय लोंढे या तरुणाचा मृत्यू झाला असून घटनेनंतर संशयित आरोपी समीर शेख आणि प्रथमेश दळवी यांनी स्वतः पोलिसांना शरण येऊन घडलेला प्रकार सांगितला.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी अविनाशच्या डोक्यात दगड घालून त्याचा जीव जाईपर्यंत त्याला अमानुष मारहाण केली. हल्ल्यानंतर अविनाश गंभीर जखमी अवस्थेत पडून होता आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटना लक्षात येताच संशयित आरोपींना झालेल्या कृत्याची जाणीव झाली. त्यानंतर दोघांनीही थेट पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. समीर इक्बाल शेख (वय 25, रा. देवळे इस्टेट, बारामती) आणि प्रथमेश राजेंद्र दळवी (वय 20, रा. जगतापमळा, बारामती) हे दोघे पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले असून त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले असून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून घडली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे बारामती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. बारामती शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून तरुणांचा गुन्ह्यातील सहभाग चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी घटनांतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
