Raigad Crime: रायगडमध्ये एका महिलेने सोशल मीडियावर प्रेमाचे जाळे रचून अनेक तरुणांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही महिला तरुणांना लग्नाचा बनाव रचून लाखो रुपयांची खंडणी उकळत होती. तक्रारदारांनी स्टिंग ऑपरेशन करून पुरावे गोळा करत पोलिसांना दिले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्लॅन आखत असे. सुरुवातीला प्रेमाचे आमिष दाखवून, नंतर राज्याबाहेर फिरायला नेऊन भावनिक बंध निर्माण करत असे. यानंतर, ती तरुणांना आपल्या उरण येथील घरी बोलावून आणत असे. तिथे एका विशिष्ट भटजीच्या मदतीने लग्नाचा देखावा रचला जात असे. या लग्नासाठी पेण तालुक्यातील एकच भटजी सतत वापरला जात असल्याने, हे एक संघटित रॅकेट असल्याचा संशय बळावला आहे.
आपलं उद्दिष्ट साधल्यानंतर, ही महिला वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी करत असे. खंडणी न दिल्यास, तरुणांवर गैरकृत्याचा खोटा आरोप करून पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली जात असे. तक्रार मागे घेण्यासाठीही पैशांची मागणी केली जात असे आणि पैसे मिळाल्यावर ती स्वतःच पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेत असे. या महिलेने यापूर्वीही अनेक खोट्या तक्रारी दिल्या असल्याचं तक्रारदारांनी सांगितलं.
या हनीट्रॅप टोळीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलं असून, उरण-पनवेल पट्ट्यातील अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. या सर्व प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी तक्रारदारांनी स्वतः स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी फोटो, व्हिडिओ आणि संभाषणाचे अनेक पुरावे जमा केले आहेत, जे आता पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. ही महिला “माझे नातेवाईक वकील आहेत” असे सांगून अनेकांना धमकावत असल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, हनीट्रॅपचे आणखी बळी पुढे यावेत आणि हे रॅकेट पूर्णपणे उघड व्हावे यासाठी तक्रारदारांनी आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “या महिलेच्या जाळ्यात कोणी सापडले असेल, तर न घाबरता पोलिसांना कळवा. सत्य बाहेर येणारच.” या प्रकरणात आगामी काळात मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता असून पोलिसांकडून काय कारवाई केले जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
