मुंबईत चुनाभट्टीपासून दादरच्या दिशेला रिक्षातून जाणाऱ्या भीम अनुयायांना पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी रिक्षा नियमानुसार पुढे जाऊ दिली जाणार नाही, असं म्हटलं. त्यामुळे भीम अनुयायांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे साडेतीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे अखेर पोलिसांना भीम अनुयायांची मागणी मान्य करावी लागली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल होत आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे अनुयायी विविध वाहनांमधून दादर येथील चैत्यभूमी येथे पोहोचत आहेत. काही जण बसमधून, काही जण त्यांच्या चारचाकी वाहनांमधून तर काही जण इतर वाहनांनी मुंबईत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत.
मुंबई आणि लगतच्या शहरांमधील अनेक भीम अनुयायी हे रिक्षा किंवा दुचाकींनी मुंबईत दाखल होत आहेत. पण मुंबई हे महत्त्वाचे आणि संवेदनशील शहर असल्या कारणाने तसेच वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून वाहतुकीची काही नियमावली आखण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून नियमानुसार, चुनाभट्टीच्या पुढे दादरच्या दिशेला रिक्षा जाऊ देण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे रिक्षातून आलेले भीम अनुयायी हे आक्रमक झाले.
मुंबई पोलिसांनी रिक्षा अडवल्या, भीम अनुयायांनी चुनाभट्टीजवळ 2 तास रस्ता रोखला, नेमकं काय घडलं?
आपल्याला रिक्षातून जावू द्यावे असं भीम अनुयायांची मागणी होती. पण मुंबई पोलिसांकडून परवानगी दिली जात नव्हती. त्यामुळे रिक्षातून आलेले भीम अनुयायी हे प्रचंड आक्रमक झाले. या अनुयायांमध्ये महिलांचादेखील मोठा समावेश होता. पोलिसांच्या भूमिकेमुळे आक्रमक झालेल्या भीम अनुयायांनी थेट रास्ता रोखून धरला. यामुळे मुंबई-पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. जवळपास साडेतीन तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सर्व गाड्या एकाच ठिकाणी स्थानबद्ध झालेल्या बघायला मिळाल्या.
चुनाभट्टीपासून रिक्षाला जावू दिलं जाणार नाही, असं प्रशासनाकडून किंवा पोलिसांनी आधी जाहीर करणं अपेक्षित होतं. तसं न करता अचानक रिक्षांना जाण्यास रोखण्यात आलं, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक आक्रमक झालेले होते. आंदोलकांचा आग्रह पाहता पोलिसांना माघार घ्यावी लागली. पोलिसांनी अखेर रिक्षा घेऊन जाण्यास भीम अनुयायांना परवानगी दिली. यामुळे भीम अनुयायी देखील खूश झाले. त्यांनी जल्लोषही केला. तसेच गेल्या साडेतीन तासांपासून अडकून राहिलेली ही वाहतूक कोंडीदेखील अखेर फुटली.
