मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
पुण्याच्या कोंढवाच्या कोरोगाव आयटी पार्क येथील जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केली होती. संबंधित जमिनीच्या पॉवर ऑफ अॅटर्नी शीतल तेजवानी या होत्या. त्यांनी पॉवर ऑफ अॅटर्नीचा वापर करुन शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या नावावर केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानी हिला दोन वेळा चौकशीसाठी बोलावलं होतं. तिची चौकशी देखील झाली होती.शीतल तेजवानी हिच्याकडे पोलिसांनी वारंवार कागदपत्रांची मागणी करुनही ओरिजनल कागदपत्रे सादर केले जात नव्हते. त्यामुळे शीतल तेजवानी हिने शासनाची फसवणूक केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाल्याचं बोललं जात आहे. शीतल तेजवानी हिने खोट्या कागदपत्रांचा वापर करुन पॉवर ऑफ अटर्नी बनवण्यात आली. त्यातून शासकीय जमीन खासगी कंपनीला विक्री करण्यात आली.
सांगलीच्या आष्टामध्ये EVM ठेवलेल्या हॉलबाहेर मोठा राडा, कालच्या मतदानानंतर 2 हजार मतं वाढल्याचा आरोप
या प्रकरणात शीतल तेजवानी हिची दोन वेळा चौकशी झाली होती. त्यापैकी एकेदिवशी साडेचार तास कसून चौकशी झाली होती. पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर आता शीतल तेजवानी हिला अटक केली आहे. शीतल तेजवानीच्या अटकेनंतर आता या प्रकरणात काय-काय माहिती समोर येते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया काय?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शीतल तेजवानी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “तेजवानी यांना अटक झाली ते खूप बरं झालं. कारण आता सगळ्या गोष्टी बाहेर येतील. या फ्रॉडला नेमकी कशी सुरुवात झाली होती, त्याची माहिती समोर येईल. अमेडिया कंपनीला फ्रॉड डॉक्यूमेंट बनवून हा व्यवहार झाला होता. हा व्यवहार कसा झाला? याबाबत सर्व माहिती समोर येईल. या बाई अशा सर्व व्यवहार करायच्या. त्यांची माहिती मी ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना पाठवली होती”, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी एका वृत्त वाहिनीला दिली.
